ताज्या बातम्या

Maha Shivpuran Katha Jalgaon : चांगल्या लोकांमध्ये भगवंताचा शोध घ्या : पंडित प्रदीप मिश्रा

Maha Shivpuran Katha Jalgaon : भगवंताच्या दर्शनासाठी प्रत्येकवेळी मंदिरातच गेले पाहिजे असे नाही.

आपल्या सभोवतालच्या लोकांमधील चांगल्या गुणांचे दर्शन घ्या, त्यातच आपल्याला भगवंत, महादेव दिसून येईल, असे विचार पंडित प्रदीप मिश्रा यांनी बुधवारी (ता. ६) मांडले.(Pandit Pradeep Mishra statement of Seek God in Good People jalgaon news )

जळगाव शहराजवळील कानळदा मार्गावर वडनगरी फाट्यालगतच्या बडे जटाधारी महादेव मंदिर परिसरात पंडित मिश्रा यांची श्री शिवमहापुराण कथा सुरू आहे. कथेच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी निरूपण केले. निरूपणात श्री. मिश्रा यांनी वेगवेगळ्या उदाहरणांद्वारे भगवंत दर्शनाचे महत्त्व पटवून सांगितले. ते म्हणाले, की शिवमहापुराणात दर्शनाचा अर्थ अत्यंत व्यापक पद्धतीने सांगण्यात आला आहे.

आपला संपर्क, संग चांगल्या लोकांशी असेल, आपण ज्या चांगल्या व्यक्तींमध्ये राहत असू अशा आपल्या कुटुंबातील सदस्य, नातलग, कॉलनी, शहरातील लोकांमधील चांगल्या गुणांचा अंगीकार करा. त्यांच्यातील चांगल्या गोष्टी पाहायला शिका. सासू- सुनेने एकमेकांमधील चांगल्या गोष्टी पाहिल्या, तर तेच आपल्याशी भगवंताचे दर्शन असते.

दगडात देव…‘कंकड मे शंकर’

आपण अनेक ठिकाणी दगडात देव शोधतो. ‘हर कंकड में शंकर है…’असेही आपण म्हणतो. ते खरेच आहे. मात्र, त्यासाठी प्रत्येकवेळी मंदिरात जाण्याची गरज नाही. माणसांत भगवंत शोधला पाहिजे, असा मंत्रही श्री. मिश्रांनी दिला.

श्री शिवमहापुराण कथेच्या महतीबद्दल…

श्री शिवमहापुराण कथेचे महत्त्व सांगताना श्री. मिश्रा म्हणाले, की श्री शिवमहापुराण कथास्थळी जे भक्तगण मंडपात येऊन श्रवण करत आहेत, त्यांना संपूर्ण ७ दिवसांची कथा ऐकल्यानंतर महादेवाचे अस्तित्व याठिकाणी असल्याचे जाणवेल. अनेकांनी असे अनुभव विशद केले आहेत.

कोणत्याही स्वार्थाविना, ऊन, वारा, थंडी, पावसाची तमा न बाळगता भक्त आले आहेत. ते भलेही घरी चांगले भोजन करत असतील, पण कथास्थळी महादेवाचा प्रसाद म्हणून जे मिळेल ते स्वीकारत असून हे महादेवाच्या सान्निध्याने शक्य होतेय.

२२ जानेवारीला दिवाळी साजरी करा

धुळ्यातील कथेत एका भक्ताने ‘मी भाग्यवान आहे का?’ असा प्रश्‍न विचारला. त्याच्यासह सर्वांना सांगणे आहे की, जे या भूमीत, भारतात जन्मले ते सर्व नागरिक भाग्यवान आहेत. आपल्या भारताची सेवा करण्याची संधी मिळणे हे मोठे भाग्य आहे, असे सांगून अयोध्येतील राम मंदिराबाबत श्री. मिश्रा म्हणाले, की २२ जानेवारी २०२४ ला भारताच्या अवध नगरीचे राजा श्रीराम विराजमान होताय.

राम लंकेवर विजय मिळवून आल्यानंतर आपण दिवाळी साजरी केली. तशी दिवाळी त्यादिवशी साजरी करा. आम्ही कुबेरेश्‍वरला पुन्हा दीपोत्सव साजरा करणार आहोत. तसा तो पूर्ण देशाने करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *