मुंबई– मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नवा जीआर स्वीकारला आहे. सभेमध्ये बोलताना जरांगे पाटील यांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी ते म्हणाले की, माझा तमाम मराठा बांधवांना मानाचा जय शिवराय. आपण याठिकाणी आलो होतो तो हेतू साध्य झाला आहे.
५४ लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यांना आणि त्यांच्या सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात यावं यामागणीसाठी आपण येथे आलो होतो. जवळपास पाच महिन्यांपासून संघर्ष केलाय. सगेसोयऱ्यांना आरक्षण मिळण्यासाठी अध्यादेश आवश्यक होता. या अध्यादेशासाठी अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. कुटुंब उघड्यावर पडले आहेत, असं ते म्हणाले.
अण्णासाहेब पाटलांपासून, मेटे, जावळे साहेब यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठ्यांवर होती. नोंदी मिळालेल्या मराठ्यांना तातडीने प्रमाणपत्र देण्यासाठी शिबिर सुरु करण्यात आले. नोंदी आढळल्या त्यांच्या सगेसोयऱ्यांनी अर्ज केल्यास त्यांनाही प्रमाणपत्र द्यावं. याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी अध्यादेश काढला. त्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांचे धन्यवाद, असं ते म्हणाले.
मराठा आंदोलक उघड्यावर झोपले. आरक्षणासाठी तिनशे पेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केल्या. मुख्यमंत्र्यांकडे माझी एकच विनंती आहे, जो अध्यादेश काढलाय. कुणबी नोंद मिळाल्या त्यांच्या सर्व सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, अध्यादेश आला असला तरी ही एक कळकळीची विनंती आहे, असं जरांगे म्हणाले.