ताज्या बातम्या

Nanded News : १४७ दिव्यांग नवमतदारांची नांदेडमध्ये नोंदणी

‘माझं मत, माझं भविष्य’ अभियान; मालपाणी मतीमंद विद्यालयात प्रतिसाद

नांदेड : शहरातील मगनपुरा भागातील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात शुक्रवारी (ता. आठ) ‘माझं मत, माझं भविष्य’ अभियान राबविण्यात आले. त्यात आलेल्या दिव्यांग मतदार नोंदणी व चिन्हांकन उपक्रमात १४७ कर्णबधिर, बौद्धिक अक्षम दिव्यांग नवमतदार नोंदणी तर २७ दिव्यांग मतदारांच्या मतदान ओळखपत्रावर दिव्यांग असल्याचे चिन्हांकीत करण्यात आले. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग, महात्मा गांधी सेवा संघ संचालित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व राजस्थानी एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.

आगामी लोकसभेसह सर्वच निवडणुकांत दिव्यांग व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये तसेच मतदान ओळखपत्रात दिव्यांग असल्याबाबत चिन्हांकन केले नसल्यामुळे होणारी गैरसोय दूर व्हावी, यासाठी नव मतदारांची नोंदणी व चिन्हांकन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिव्यांगांची अचूक व वास्तविक माहिती अनेक योजनांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. तसेच शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठीही मतदान कार्ड असणे गरजेचे आहे. या उद्देशातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजित राऊत, राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, सचिव प्रकाश मालपाणी सहसचिव लक्ष्मीकांत बजाज, मुख्याध्यापक नितिन निर्मल यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालय, श्रीरामप्रताप मालपाणी मुकबधीर विद्यालय, निवासी मतिमंद विद्यालय, सांगवी, नांदेड, छत्रपती शाहू महाराज अपंग विद्यालय, काबरा नगर, नंदनवन प्रौढ मतिमंदांची कृषी कार्यशाळा तसेच शाळाबाह्य दिव्यांग नव मतदार अशा १४७ व २७ दिव्यांग मतदारांच्या मतदार ओळखपत्रावर दिव्यांग असल्याचे चिन्हांकीत करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची कौतुकाची थाप

आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक नितिन निर्मल यांनी दिव्यांगाना केंद्रस्थानी ठेवत त्यांच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. अशा अनेक उपक्रमांना जिल्हाधिकारी राऊत यांची उपस्थिती होती. यावेळीही दिव्यांग मतदार नोंदणी व चिन्हांकन उपक्रम यशस्वी करण्यासाठीची त्यांची धडपड पाहता आजच्या कार्यक्रमात नितिन निर्मल यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत जिल्हाधिका-यांनी प्रशंसा करत भविष्यातही असे उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *