नवाब मलिक यांनी अधिवेशनाला हजेरी लावली, यावेळी ते अजित पवार गटाच्या सत्ताधारी बाकावर बसले त्यानंतर राज्यातील वातावरण तापले होते. विरोधकांनी या मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकाही केली.
नागपूर- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्या सत्ताधारी बाकांवर बसण्यावरून विरोधी पक्षाने देशद्रोहाचा आरोप असलेले मलिक सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले चालतात का, अशी जहरी टीका केली होती. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून मलिक यांना महायुतीत घेऊ नये, अशी विनंती केली होती. यामुळेच मलिक यांनी हिवाळी अधिवेशनात सुरवातीचे दोन दिवस वगळता अधिवेशनाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येतं आहे.
गॅंगस्टर दाऊदशी संबंधित सलीम पटेल आणि हसीना पारकर यांच्या गोवावाला कंपाउंडच्या जमीन व्यवहारात अपहार केल्याचा आरोप नवाब मलिक यांच्यावर आहे. ते सध्या जामिनावर तुरुंगातून बाहेर आहेत. जामिनावर बाहेर आल्यानंतर ते सत्ताधारी बाकावर बसले होते.
यावरून राज्यातील वातावरण तापले होते. विरोधकांनी या मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकाही केली. या मुद्द्यावरून फडणवीस यांनी अजित पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. यावरुन राष्ट्रवादीत मधल्या कालावधीत घडलेल्या घडामोडींशी नवाब मलिकांचा कुठलाही संबंध नाही.
आजारपणाच्या मुद्यावर त्यांना जामीन मिळाल्यानंतर जुने सहकारी म्हणून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आमची भेट झाली. आम्ही त्यांच्याशी कुठलीही राजकीय चर्चा केलेली नाही. त्यामुळे त्यांचा कोणत्या गटात सामील होण्याचा संबंधच नाही, अशी भूमिका अजित पवार गटाने घेतली होती. त्यामुळे यांची नेमक्या कोणत्या गटात सामील व्हावे, यावरून अडचण झाली आहे. त्यामुळे त्यांनी अधिवेशनाला न येणेच पसंत केले.
मलिक यांनी का टाळले अधिवेशन?
गरज असूनही अजित पवार गटाने स्वीकारले नाही
अजूनही देशद्रोहीचा खटला चालू असल्याने प्रकरण न चिघळण्यास प्राधान्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही मलिक महायुतीत सामील होण्यास विरोध
महायुतीत नाकारल्याने अवमान झाल्याची भावना
आपल्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडू नये म्हणून एक पाऊल मागे