New Year 2024: जिल्हा पोलिस पथकांनी बुधवारी (ता.२७) रात्री नाकाबंदी करीत एक हजार २०० चारचाकी, दुचाकी वाहनांसह हॉटेल्स, लॉज आणि अभिलेखावरील गुन्हेगारांचीही तपासणी केली.
या विशेष कारवाईत ७५ दुचाकीस्वारांकडून २६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.
पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील प्रभारी अधिकाऱ्यांना रात्री आठ ते अकरा या वेळेत विशेष नाकाबंदी करून कारवाई करण्याचे आदेश दिलेत.
त्यात फरार व पाहिजे असलेल्या आरोपींना अटक करणे, अवैध शस्त्रांवर कारवाई करणे, अभिलेखावरील सराईत गुन्हेगारांची तपासणी करणे, हद्दीतील हॉटेल, लॉज, ढाबे तसेच गुन्हेगारी वस्त्यांमध्ये तपासणी करणे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी व चारचाकी मालकांवर कारवाई करणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करणे, संशयित वाहनांची तपासणी करणे, वॉरंटची बजावणी करणे, अवैध धंद्यांवर कारवाई करणे आदींचा समावेश होता.
अधीक्षक धिवरे यांच्यासह अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी, ३० पोलिस अधिकारी, ११७ अंमलदारांनी एक हजार १९४ चारचाकी व दुचाकी वाहने, ७८ हॉटेल्स, ४४ ढाबे, ३० लॉजेसची तपासणी केली. यावेळी ७५ वाहनांवर केसेस करून २५ हजार ७५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या पाच चालकांवर व दारूबंदीच्या पाच केसेस करण्यात आल्यात.
आगामी निवडणुका, सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर यापुढेही अशाच प्रकारे वेळोवेळी नाकाबंदी व ऑलआऊट ऑपरेशन राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक धिवरे यांनी दिली. या मोहिमेचे जिल्ह्यातून स्वागत झाले.