मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना आव्हाड यांच्या मांसाहाराच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. आव्हाड शेणही खात असतील असं ते म्हणाले होते. यावरुन आव्हाडांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.(Are you saying that 77 percent of people in the country eat dung jitendra awhad criticize devendra fadnavis )
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर टीका करीत असताना म्हटलं की, ‘ते काय शेणही खात असतील!’ मी माझ्या भाषणात स्पष्ट म्हटलं होतं की, “मी मटण खातो; मटण खातो, म्हणजेच मांसाहार करतो.” महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील सुमारे ७७ टक्के लोक मांसाहारी आहेत. मग, मांसाहार करणारा प्रत्येक माणूस शेण खातो, असं आपलं म्हणणं आहे का, असा सवाल आव्हाडांनी केलाय.
तुमच्या बोलण्यानुसार देशातील ७७ टक्के लोक शेण खातात, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच, बहुजन समाज शेण खातो, असे आपले म्हणणे असेल तर आश्चर्यच आहे. हो, नाहीतरी आता नवीन सुरु झाले आहे की, मांसाहार करणारे हे जरा खालचेच असतात. वगैरे वगैरे. शाकाहार …उच्च मांसाहार … नीच, असं म्हणत त्यांनी पलटवार केलाय.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीतील शिबिरात प्रभु रामांबाबत भाष्य केलं होतं. प्रभु राम हे बहुजनांचे आहेत, ते मांसाहार करायचे, असं ते म्हणाले होते. यावरुन वाद निर्माण झाला होता. भाजप नेते त्यांच्या या वक्तव्यावरुन आक्रमक झाले होते. आव्हाड यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आव्हाड यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.