पाटणा– बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाजपसोबत जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते रविवारी म्हणजे २८ तारखेला भाजपसोबत पदाची शपथ घेऊ शकतात. नितीश कुमार भाजपसोबत जात सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. भाजपच्या दोन नेत्यांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळणार आहे. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने माहिती दिली आहे.
इंडिया आघाडीसाठी हा मोठा धक्का आहे. कारण, दोन दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि पंजाबमधील आपचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी स्वतंत्रपणे लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता नितीश कुमार भाजपसोबत गेले तर इंडिया आघाडीची मोठी पिछेहाट होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे.
जेडीयूने रविवारी असलेले आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. रविवारी नितीश कुमार महाराणा प्रताप जयंती निमित्त एका सभेला संबोधित करणार होते. पण, हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. नितीश कुमार यांनी भाजपसोबत बोलणी सुरु केली होती. भाजप वरिष्ठांनी पुन्हा नितीश कुमार यांना सोबत घेण्यास मंजुरी दिल्याचं कळतंय. तसेच पुन्हा नितीश कुमार हेच मुख्यमंत्रीपदी राहणार आहेत.
२०१७ मध्ये नितीश कुमार भाजपसोबत गेले होते. २०२2 मध्ये नितीश यांनी पुन्हा लालू यादव यांच्या आरजेडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. आता ते परत भाजपसोबत जाणार आहेत. त्यामुळे नितीश कुमारांनी आपली ‘पलटू कुमार’ अशी प्रतिमा कायम ठेवली आहे. असे असले तरी भाजपकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीकडून कमी जागा मिळत असल्याने त्यांनी असा निर्णय घेतला असल्याचं बोललं जातंय.