पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर मालदीववरील भारताचा संताप कमी होण्याचे नाव घेत नाहीये. या प्रकरणी सोशल मीडियावर युजर्स खूपच भडकल्याचे पाहायला मिळाले होते, यानंतर आता बड्या ट्रॅव्हल कंपन्यांनी देखील या प्रकरणात बाजू घेण्यास सुरुवात केली आहे. ईज माय ट्रिप या ट्रॅव्हल कंपनीने मालदीवला मोठा झटका दिला आहे.
देशातील सर्वात मोठी ट्रॅव्हल कंपनी ईज माय ट्रिपने मालदीवला जाणाऱ्या सर्व फ्लाइट बुकिंग रद्द केल्या आहे. कंपनीचे सहसंस्थापक आणि सीईओ निशांत पिट्टी यांनी स्वत: सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. निशांत पिट्टी यांनी म्हटले आहे की, देशाच्या एकात्मतेला जोडत EaseMyTrip मालदीवच्या सर्व फ्लाइट बुकिंग सस्पेंड करण्याचा निर्णय घेतला आहे.
काय झालं होतं?
मालदीवच्या मंत्री मरियम शिउना यांनी पंतप्रधान मोदींबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. भारताने मालदीवच्या मोहम्मद मुइज्जू सरकारकडे हा मुद्दा उपस्थित केला होता. माले येथील भारतीय उच्चायुक्तांनी मंत्र्यांच्या या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला होता. भारताच्या आक्षेपानंतर मालदीव सरकारने एक निवेदन जारी करत हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे म्हटले आहे. तसेच परराष्ट्रमंत्र्यांचे हे वक्तव्य मालदीव सरकारच्या मतांचे प्रतिनिधित्व करत नाही असेही सांगण्यात आले होते.
मात्र भारताच्या तीव्र आक्षेपानंतर मालदीव सरकारने पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मंत्री मरियम शिउना यांच्यासह मालशा शरीफ आणि महजूम माजिद यांना निलंबित केले होते. मालदीव सरकारचे प्रवक्ते मंत्री इब्राहिम खलील यांनी दिलेल्या माहितीनुसार, वादग्रस्त वक्तव्यासाठी जबाबदार असलेल्या तीन मंत्र्यांना तात्काळ पदावरून निलंबित करण्यात आले आहे.
या सर्व प्रकरणाची सुरूवात नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर झाली. पीएम मोदींनी लक्षद्वीपचा दौरा केल्यानंतर तेथील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यानंतर त्यांनी भारतीयांना येथे पर्यटनासाठी येण्याचे आवाहन देखील केले, यानंतर मालदीवच्या मंत्री मरियम शिउना यांनी पीएम मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह टीप्पणी केली होती. या ट्वीटनंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती, त्यानंतर त्यानी ती पोस्ट डिलीट केली होती.