मुंबई– मनसेचे उपाध्यक्ष सतीश नारकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे महत्त्वाची मागणी केली आहे. अयोध्येतील प्रमुख चौकाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. राम मंदिराच्या सुरुवातीच्या आंदोलनामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची सक्रिय भूमिका होती. याच प्रकरणी अयोध्येतील मुख्य चौकाला बाळासाहेबांचे नाव देऊन त्यांचा सन्मान करण्यात यावा असं नारकर पत्रात म्हणाले आहेत.
अयोध्येमध्ये २२ जानेवारीला अभूतपूर्व सोहळा होणार आहे. या दिवशी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राम मंदिरात राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी आठ हजार मान्यवरांना निमंत्रित करण्यात आलं आहे. या ऐतिहासिक सोहळ्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याआधी मनसेकडून एक महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी अयोध्येत झालेल्या घटनेचे समर्थन केले होते. तसेच शिवसैनिकांनी असं केलं असेल तर याचा मला अभिमान आहेत, अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. यावरुन मनसेने पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिलंय. या पत्राला पंतप्रधान मोदी प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याआधी ३० डिसेंबरला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रेल्वे स्टेशन आणि नव्या विमानतळाचे नामकरण करण्यात आले होते.