ताज्या बातम्या

Ratnagiri Fish Market : कोकणात सुक्या मासळीला पर्यटकांची वाढती पसंती; दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल

चिपळूण : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात कुटुंबासह आलेले पर्यटक येथील सुक्या मासळीच्या खरेदीला पसंती देत आहेत. त्यामुळे सुक्या मासळीच्या (Fish Market) खरेदी-विक्रीतून दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. काही पर्यटनस्थळे (Tourists) तेथील नावीन्यपूर्ण वस्तू आणि खाद्यपदार्थ, फळांसाठी प्रसिद्ध असतात.

पर्यटक त्‍या वस्‍तू आवर्जून खरेदी करतात. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात समुद्रकिनाऱ्यावर आणि येथील पर्यटनस्थळावर फिरण्यासाठी आलेले पर्यटक सुक्या मासळीच्या खरेदीला प्राधान्य देत आहेत. सुकी मासळी बारमाही उपलब्ध असते. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख शहरे आणि समुद्रकिनाऱ्यावर सुकी मासळी विक्रीसाठी उपलब्ध आहे.

बंदरात वाळत ठेवलेल्या वाकट्या, बोंबील, कोळंबीचे सोडे, सुकट यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. सुकी मासळी अनेक दिवस टिकत असल्याने जास्तीत जास्त दिवस पुरेल इतका साठा करण्यासाठी जणू स्पर्धा लागते. परतीच्या प्रवासात काय नेणार, अशा विवंचनेत असलेले पर्यटक विशेषतः महिला सुकी मासळी खरेदी करण्यात रस दाखवतात. गुहागर, दापोली, रत्नागिरी चिपळूण, खेड येथे आलेल्या पर्यटकांमुळे यंदा उलाढाल कोट्यवधींत गेली आहे. सुकी मासळी किनाऱ्यावरील कोणत्याही गावात सहज उपलब्ध होणारी आहे.

इतर ठिकाणांपेक्षा येथे चांगल्या दर्जाची आणि माफक किमतीत सुकी मासळी मिळते. सुक्या मासळीला वाढती मागणी लक्षात घेऊन काही महिला विक्रेत्यांनी प्रमुख मार्गावरच दुकाने थाटली आहेत. चिपळूण शहरात सुकी मासळी टोपलीत घेऊन विकणाऱ्या महिला दिसतात. दरात थोडीफार घासाघीस केल्यास माफक दरात चांगली मासळी मिळते. एका ग्राहकाने खरेदी केल्‍यावर त्‍याच्यासोबतचे इतरही खरेदी करतात त्‍यामुळे बघता बघता काही हजारांचा माल काही मिनिटात संपत असल्‍याचे विक्रेते सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *