नागपूर: प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या कर्तव्यपथावर यंदा ‘शिवराज्याभिषेक दिन’ संकल्पनेवर आधारित चित्ररथ पाहायला मिळणार आहे. आंध्रप्रदेशच्या सीमेवर वैदर्भीय कलावंत हा चित्ररथ साकारत असून त्याची पहिली झलक २३ जानेवारी रोजी कर्तव्यपथावर होणाऱ्या तालमीमध्ये पाहायला मिळेल.
नागपूरच्या शुभ ॲड्स कंपनीला राज्याचा चित्ररथ साकारण्याचे कंत्राट मिळाला असून यवतमाळ व वर्धा येथील ३० कलावंतांचा समूह दिवसरात्र मेहनत घेत हे चित्ररथ साकारत आहेत. तुषार प्रधान (यवतमाळ) आणि रोशन इंगोले (वर्धा) कला दिग्दर्शकाची जबाबदारी सांभाळत आहेत.
तर, यशवंत एनगुर्तीवार (पाटणबोरी, जि. यवतमाळ) शिल्पकला विभागाचा व श्रीपाद भोंगाडे (हिंगणघाट, जि. वर्धा) हस्तकला विभागाचा प्रमुख आहे. याद्वारे, वैदर्भीयांतर्फे एक प्रकारे महाराजांना मानाचा मुजरा करण्यात येणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. तेलंगणच्या सीमेवर (पाटणबोरी, जि. यवतमाळ) हा चित्ररथ साकारण्यात येत आहे.
२० जानेवारी दरम्यान दिल्लीत हे चित्ररथ पोहोचणार असून २३ तारखेला नृत्य, संगीत व पोशाखासह कर्तव्यपथावर तालीम होईल. महाराष्ट्रासह छत्तीसगड राज्याचा (बस्तरचा मुरिया दरबार) चित्ररथ साकारण्याची जबाबदारीदेखील वैदर्भीयांना मिळाली आहे.
विशेष म्हणजे, गेल्या दहा वर्षांपासून चित्ररथ साकारणाऱ्या या समूहामध्ये वैदर्भीय कलावंतांचा समावेश कायम आहे. मागील वर्षी शुभ ॲड्स कंपनीच्या खांद्यावर महाराष्ट्राच्या ‘साडेतीन शक्तिपीठे’ संकल्पनेवर आधारित चित्ररथासह आसाम, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल आणि अरुणाचल प्रदेश अशा पाच राज्यांचा चित्ररथ साकारण्याची जबाबदारी आली होती. नागपुरातील या कंपनीने ती लिलया पेलत महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरे तर उत्तरप्रदेशच्या चित्ररथाला तिसरे पारितोषिक प्राप्त करून दिले होते.
शिवरायांच्या लोकशाहीचे प्रतिबिंब –
भारताचा विकास, लोकशाही या विषयांना अनुसरून असलेल्या चित्ररथांचा समावेश यंदाच्या पथसंचलनामध्ये असणार आहे. शिवरायांचा राज्याभिषेक विषयावरील या चित्ररथामध्ये महाराजांचा लोकशाहीला अनुसरून असलेला राज्यकारभार अधोरेखित करण्यात आला आहे.
चित्ररथाच्या दर्शनी भागात शिवाजी महाराजांसह मॉ जिजाऊंची प्रतिकृती दिसेल. तर, मागे महाराजांचे अष्टप्रधान मंडळ, कामकाजात सहभागी महिला, गाऱ्हाणे मांडणाऱ्या महिलांची दखल घेणारे महाराज यासह हिरकणी, दीपाऊ बांदल, सावित्री देसाई, सोयराबाई, कल्याणच्या सुभेदारांची सून अशा शिवकालीन शूर स्त्रिया देखील प्रतिकृती रुपात पाहायला मिळतील.