वैजापूर : स्थानिक अधिकाऱ्यांनी केला काणाडोळा
वैजापूर : महसूल विभागातील तब्बल दोन लाख १७ हजार शासकीय दप्तर तपासणी करूनही मराठा कुणबी नोंद असल्याचा एकही पुरावा स्थानिक यंत्रणेला आढळला नाही. त्यामुळे येथील महसूल दप्तराची फेर तपासणी हिंगोली येथील उपजिल्हाधिकारी यांच्या देखरेखीखाली सुरु केल्यानंतर फेरतपासणी मोहिमेत मराठा कुणबी नोंदीचे अनेक रेकॉर्ड आता सापडल्याने स्थानिक प्रशासनाचा बेजबाबदार कारभाराची पोलखोल झाली आहे.
दरम्यान, राज्यात आरक्षणाचा मुद्दा सवेंदनशील असताना येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बेफिकीरपणा हिंगोलीच्या पथकाकडून उघड केल्याने सगळेच चकित झाले. विशेष पथकातील उपजिल्हाधिकारी मंजूषा मुथा यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयातील सभागृहात एकूण १२ महसूल मंडळांतील गावानुसार १९४८ ते १९६७ या कालावधी मधील खासरा पत्रक, पाहणी पत्रक, क पत्रक, कुळ नोंदी वही, नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर सन १९५१, नमुना नंबर ०१ हक्क नोंद पत्रक, नमुना नंबर ०२ हक्क नोंद पत्रक, सातबारा उतारा अशा एकूण २ लाख १७ हजार महसूल दस्तावेजात मराठा कुणबी नोंदीची फेर तपासणीचे काम तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या मार्फत सुरु केले आहे.
विशेष म्हणजे यापूर्वी तहसील कार्यालयाने महसूल दस्ताऐवज तपासणीत एकही नोंद सापडला नसल्याचा अहवाल सादर केला होता. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वत्र मराठा कुणबी नोंदीची संख्या कमी प्रमाणात आढळून आल्यामुळे निवृत्त न्यायमुर्ती संदीप शिंदे यांचे अध्यक्षतेखाली समितीने जिल्ह्यातील अहवालांची फेर तपासणी विशेष पथकामार्फत करण्याचे निर्देश दिले.
यानुसार विशेष पथकातील उपजिल्हाधिकारी मुथा यांनी महसूल दप्तर तपासणी सुरु केली. या कामात तहसीलदार सुनील सावंत, नायब तहसीलदार किरण कुलकर्णी यांच्यासह इतर कर्मचारी साहाय्य करीत आहेत.
२० नावांच्या कुणबी नोंदी शैक्षणिक रेकॉर्डवर
शैक्षणिक स्तरावर १९६७ पूर्वी मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी तालुक्यातील १६२ गावांच्या शाळेत दप्तर तपासणीत नागमठाण, जरुळ, आघूर, वळण, वैजापूर, सवंदगाव येथे २० नावांच्या कुणबी नोंद शैक्षणिक रेकॉर्डवर आढळून आल्या.
या पुराव्याआधारे त्यांच्या वारसांना महसूल विभागाने जात प्रमाणपत्र वितरित केले. मात्र, महसूल विभागाकडे एकही कुणबी नोंद न आढळल्यामुळे फेरतपासणी सुरू केली.