समृद्धी महामार्गावर पहाटे ५ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. चालकाला झोप लागल्याने बाजूला असलेल्या कंटेनरला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. ही घटना अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. अहमदनगरहून रायपूरकडे जाणाऱ्या खासगी टेम्पो ट्रॅव्हल्सची बाजूच्या कंटेनरला धडक बसल्याने हा भीषण अपघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अमरावती जिल्ह्यातील गगोना शिवणी दरम्यान १२८ क्रमांकाच्या वाहिनीवर हा अपघात झाला आहे. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. काही जखमी आहेत.
अपघातातील जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या अपघाताचा पुढील तपास तळेगाव दशासर पोलीस करत आहेत. समृद्धी महामार्गांवर अपघातांचा हंगाम सुरूच आहे.