उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. अल्हगंज पोलीस स्टेशन हद्दीतील बरेली-फर्रुखाबाद महामार्गावर भरधाव ट्रकने ऑटो रिक्षाला धडक दिली. या अपघातात 12 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
शहाजहानपूरच्या मदनापूर पोलीस ठाण्याच्या दामगडा गावातून गंगेत स्नान करण्यासाठी धाई घाटावर जाणाऱ्या भाविकांनी भरलेल्या ऑटोला ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बरेली-फर्रुखाबाद महामार्गावर आल्हागंज येथील सुगसुगी गावाजवळ आज (गुरुवारी) सकाळी ११ वाजता हा अपघात झाला. या दुर्घटनेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑटो रिक्षामध्ये 12 जण प्रवास करत होते. या अपघातात चालकासह सर्व भाविकांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर डीएम उमेश प्रताप सिंह, एसपी अशोक कुमार मीना आणि जलालाबादचे आमदार हरिप्रकाश वर्मा घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले आहेत. धुक्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
पोलिस अधीक्षक अशोक कुमार मीना यांनी सांगितले की, दमगडा गावातील लोक गंगा स्नान करण्यासाठी ऑटोने फारुखाबादमधील पांचाल घाटाकडे जात होते. बरेली-फर्रुखाबाद महामार्गावर आल्हागंज येथील सुगुसुगी गावाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने ऑटोला धडक दिली.
त्यामुळे ऑटोमध्ये प्रवास करणाऱ्या आठ पुरुष, तीन महिला आणि एका मुलाचा मृत्यू झाला. ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे. त्याचा चालक फरार झाला आहे. त्याच्याविषयी तपास केला जात आहे.