Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज पुण्यात बैठक झाली. यावेळी त्यांनी अजित पवार गटावर थेट टीका करण्याचे टाळले. युवा नेत्यांना ताकद दिली तर आगामी निवडणुकीत भरघोस यश मिळेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
“ज्यांनी पक्ष सोडला त्यांची चिंता करण्याची गरज नाही. त्यांची चिंता न करता आपण नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवायला हव्यात. जर आपण आपल्या युवा नेत्यांना सक्षम करू शकलो, तर आगामी निवडणुकीत तुम्हाला मोठे यश मिळेल. त्यामुळे आपण कामाला लागलं पाहिजे आणि आपली विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.. त्यामुळे मला खात्री आहे की आपण हे करू शकलो तर तरुण नेते उदयास येताना दिसतील,” असं शरद पवार म्हणाले.
आगामी निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार आहे. अजित पवार यांनी लोकसभेच्या 4 जागा लढवणार असल्याची घोषणा केली आहे. यामध्ये बारामतीचाही समावेश आहे. त्यामुळे शरद पवार गटाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजित पवारांसह अनेक आमदारांनी साथ सोडल्याने शरद पवार आता नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहेत. त्यामुळे ही शरद पवार गटाची जमेची बाजू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आज पुण्यात झालेल्या बैठकीत नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.