नवी दिल्ली : राज्याच्या राजकारणात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदी येतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व्यक्त करत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाने या दोघांवर सामनातून टीका केली आहे. महाराष्ट्राचा धर्म हा पुरुषार्थ आणि स्वाभिमान आहे, तुंबाजी आणि मंबाजीसाठी नाही, असे म्हणतात.
लढण्याआधीच शस्त्रे ठेवली
लोकसभा निवडणूक पुढील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे. पण अद्याप निवडणूक झालेली नसतानाही निवडून मोदीच येणार असा प्रचार शिंदे-पवारांकडून केला जात आहे. यावर भाष्य करताना शिवसेनेनं म्हटलं की, जो लढलाच नाही त्यानं विजयाचे हाकारे देऊ नयेत, लढण्याआधीच यांनी शस्त्रे ठेवली आहेत. महाराष्ट्र धर्म हा मर्दांचा व स्वाभिमान्यांचा आहे, तुंबाजी व मंबाजीसारख्यांचा नाही.
सरकारमध्ये वैचारिक गोंधळ
मोगलांना आपल्या लेकी, सुना देऊन स्वतःची मुंडकी अन् पदं वाचवणाऱ्यांना महाराष्ट्रानं कधीच जुमानलं नाही, मिध्यांनी हेच धोरण राबवलं आहे. धर्मनिरपेक्षतेसाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल असं म्हणणाऱ्या अजित पवारांमुळं राज्याच्या सरकारमध्ये वैचारिक गोंधळ निर्माण झाला आहे.
कारण भाजप हिंदुत्ववादी, त्यांच्यासोबत शिंदे गट बोगस हिंदुतत्ववादी अन् अजित पवारांचा धर्मनिरपेक्ष गट अडकून पडलाय. पण शिंदे-अजितदादा गटानं कोणत्या चिन्हावर लढायचं हे भाजपचं हायकमांड ठरवणार आहे. यांच्यातील कलंकितांना उमेदवारी देऊ नये असं भाजपचं म्हणणं आहे.
भ्रमाचा भोपळा फुटणार
जनता मोदींनाच निवडून देईल हा भ्रमाचा भोपळाही फुटल्याशिवाय राहणार नाही, असं दावा करताना अजित पवारांच्या प्रचाराला मोदी येणार हे महाराष्ट्राला पहायचच आहे. प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ यांच्या प्रचाराचा नारळ अमित शहा फोडतील तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांची अवस्था कशी असेल? सुनील केदार यांना गैरव्यवहाराचं प्रकरण भोवलं पण सिंचन घोटाळा, शिखर बँक घोटाळा, कोल्हापूर बँक घोटाळा, भीमा-पाटस बँक घोटाळा करणाऱ्यांचा कमळाबाईशी निकाह झाला आहे. यांच्यावर कारवाईचा बगडा कधी होणार.
भाजपला शिवसेना-राष्ट्रवादी संपवायची
अजित पवार सांगतात जनता मोदींनाच निवडून देईल, मोदी व्यक्तिगत निवडून येतील पण भाजप अन् दोन्ही गटांचे बेईमान लोक पराभूत होतील. त्यामुळं मोदींच्या विजयाचा बँडबाजा कोणी वाजवायची गरज नाही. फुटीरांमुळं भाजपच्या अंगावर तोळाभर मांस वाढेल अशाही भ्रमात कोणी राहू नये.
सध्या दिल्लीश्वरांना महाराष्ट्राचा स्वाभिमान संपवायचा आहे. मुंबईला वेगळी करायची आहे, यासाठी त्यांनी शिवसेना-राष्ट्रवादी हे प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत, असा आरोपही यावेळी ठाकरे गटाकडून केला आहे.