Tata-Airbus Deal: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी टाटा समूहाने विमान निर्मिती कंपनी एअरबससोबत करार केला आहे. हा करार देशात सिंगल इंजिन हेलिकॉप्टर आणि इतर विमानांच्या निर्मितीसाठी आहे. भारतातील उत्पादनाला चालना देण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.
टाटा ग्रुपने व्यावसायिक वापरासाठी एअरबस H125 सिंगल-इंजिन हेलिकॉप्टरची संयुक्तपणे निर्मिती करण्याचा करार केला आहे. गुजरातमधील वडोदरा येथे याचे उत्पादन होईल. दोन्ही कंपन्या किमान चाळीस C-295 वाहतूक विमाने तयार करतील, ज्याची देखभाल टाटा लिमिटेड करेल.
प्रजासत्ताक दिनानिमित्त परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी या कराराची घोषणा केली. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन सध्या भारत दौऱ्यावर होते. टाटा आणि एअरबस यांच्यात हा करार परस्पर संमतीने झाला आहे.
फ्रान्स आणि भारत यांच्यातील वाढत्या संबंधांमुळे विशेषत: संरक्षण, अणुऊर्जा आणि अवकाश या क्षेत्रांमध्ये राजकीय संबंध मजबूत होण्यास हातभार लागला आहे. 2023 मध्ये, पंतप्रधान मोदी फ्रान्समधील बॅस्टिल डे समारंभाला उपस्थित राहिले होते, त्या दरम्यान पानबुडी आणि राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा करार झाला होता.