पशुधन

Animal Management : जनावरांचे आहार, आरोग्य व्यवस्थापन

Animal Feed Management : हिवाळ्यात जनावरांना जास्त खाद्य देणे गरजेचे असते, त्यामुळे जनावरांची चयापचय क्रिया वाढते. शरीरात अधिक ऊर्जा उष्णता निर्माण होऊन शरीराचे तापमान नियमित ठेवले जाते.

Animal Health Management : हिवाळ्यातील अति थंड वातावरणामध्ये जनावरांचे स्नायू आखडतात. त्यामुळे जनावरे लंगडतात तसेच त्यांची त्वचा खरबरीत होते. बऱ्याच वेळा जनावरांचे पोट गच्च होते तर रवंथ प्रक्रिया मंदावते. सडावर भेगा पडून दूध काढताना रक्त येते किंवा जनावर दूध काढू देत नाही, अस्वस्थ होते. थंडीमध्ये ऊर्जेची गरज वाढते त्यामुळे जनावरांना या काळात चाऱ्याची जास्त गरज असते.

चारा कमी पडल्यास जनावर अशक्त दिसते. दुधाळ जनावर पान्हा व्यवस्थित सोडत नाही, त्यामुळे दूध उत्पादनात घट होऊन दुधाच्या दर्जावर परिणाम होतो. चिकाची प्रत खालावते. पाणी कमी पिण्यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनात घट होते.

अति थंडीच्या काळात ताण निर्माण होऊन कुपोषण झाल्यास अशक्त वासरे जन्माला येतात. थंड तापमानाचा सामना करण्यासाठी, गुरे हिवाळ्यात जाड होते. त्यांच्या शरीरातील उष्णता वाढवतात. पशुधनाची हृदय गती आणि श्‍वासोच्छ्वास वाढतो. रक्त प्रवाह वाढल्यामुळे हातपाय गोठण्यापासून वाचतात.

वासरांवरील परिणाम ः

१) हिवाळा आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीस जन्मलेल्या वासरांना थंड वातावरणाचा नकारात्मक परिणाम होऊन तापमान कमी होण्याची अधिक शक्यता असते. अतिथंडीमुळे गारठून मृत्युमुखी पडतात. वासरांच्या विश्रांतीच्या ठिकाणी जाड, कोरडा पेंढा किंवा भुस्सा पसरून घ्यावा.

२) गोठ्यामध्ये थंड वारे लागणार नाही, याची काळजी घ्यावी. थंड हवामानात उबदार ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अतिरिक्त ऊर्जेची भरपाई करण्यासाठी वासराला खाण्यासाठी आवश्यक असलेले अतिरिक्त खाद्य (स्टार्टर, मिल्क रिप्लेसर किंवा दूध) द्यावे.

३) वासराच्या आहारात वारंवार बदल करू नयेत. तीन आठवड्यांपेक्षा कमी वयाच्या वासरांसाठी जे अद्याप धान्य खात नाहीत त्यांच्यासाठी ब्लँकेट उपयुक्त आहे.

गोठ्यातील व्यवस्थापन ः

१) गोठ्याच्या छतावर वेळेत गवत अंथरावे. सूर्यप्रकाशात जनावरांना बांधावे. त्यामुळे आजारांचा धोका कमी होतो. गोठ्यामध्ये थंड वारे लागणार नाही, याची काळजी घ्यावी. गोठ्यामध्ये कोरडा चारा द्यावा.

२) जास्त थंडी असल्यास, गोठ्यामधील वातावरण उबदार करावे. मात्र धूर व्यवस्थित बाहेर जाईल याची दक्षता घ्यावी. थोडासा ओलावा जनावरांच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतो. जनावरांना थेट गुळगुळीत जागेवर बसू देऊ नका. गोणपाट किंवा बेडिंगची व्यवस्था करावी.

३) जनावरांना ओलाव्यापासून दूर ठेवावे. उष्णतेसाठी शेकोटी पेटविली असेल, तर त्यापासून निघणाऱ्या धुरापासून त्यांचा बचाव करावा. ओलसरपणा आणि धूर यामुळे जनावरांना न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. गोठ्यातील सांडलेले पाणी, मूत्र निघून जावे यासाठी गोठ्यातील जमिनीला उतार देऊन नाली काढावी, गोठा कोरडा करावा. सकाळी पडदे उघडून हवा खेळती राहील अशी सोय करावी.

४) अशक्त जनावरांना कळपांमध्ये आवश्यक ते पोषण मिळत नाही. त्यांची ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी त्यांचे पोषण चांगले आहे याची खात्री करण्यासाठी अशक्त जनावरांना वेगळे करणे महत्त्वाचे आहे. त्यांच्याकडे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खाद्य पूरक आणि खनिजांसह भरपूर चारा असल्याची खात्री करावी.

आहार, व्यवस्थापनामध्ये बदल ः

१) थंडीच्या काळात जनावरांना त्यांच्या ऊर्जेचा साठा राखणे महत्त्वाचे आहे. हिवाळा सुरू होण्यापूर्वी, चाऱ्याची प्रत तपासून

घ्यावी. जेणेकरून कुपोषण होणार नाही, प्रत्येक जनावरांच्या आरोग्याच्या स्थितीचे मूल्यांकन करावे. त्यानुसार त्यांच्या पोषणाचे नियोजन करावे.

२) जनावरांच्या शरीरात ऊर्जा निर्माण होण्यासाठी त्यांच्या अन्नाचे सेवन जास्तीत जास्त करणे आवश्यक आहे. पुरेशा ऊर्जेशिवाय, प्राण्यांना उष्णता निर्माण करणे कठीण होईल, ज्यामुळे त्यांचे तापमान कमी होऊ शकते आणि त्यामुळे मृत्यू होऊ शकतो.

३) थंड तणावाच्या प्रतिसादात थायरॉइड कार्य आणि चरबी चयापचय वाढते.

४) जनावरांच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहावे यासाठी खाद्यामधून पेंड व गूळ द्यावा. उच्च दर्जाच्या चारा व पशुखाद्याचा मुबलक साठा असावा. सुधारित पशुपोषण पद्धतीने पूरक खाद्य वापरावेत.

५) जनावरांना जंतनाशके द्यावीत. जनावरांना मोहरीचे तेल द्यावे. यासोबतच गूळ आणि इतर संतुलित आहार द्यावा.

६) जनावरांच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी हिरवा चारा आणि सुका चारा ३:१ या प्रमाणात द्यावा. वेळोवेळी जनावरांना लापशी खाऊ घालावी. शक्य असल्यास कोमट पाणी द्यावे. संध्याकाळचा चारा सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान द्यावा, कारण दिलेल्या आहाराचे चयापचय होऊन ऊर्जानिर्मितीसाठी कमीत कमी सहा ते आठ तास लागतात. म्हणजेच तयार होणारी ऊर्जा त्यांच्या तापमान नियमनासाठी रात्री थंडीच्या काळात दोन ते सकाळी सहाच्या दरम्यान वापरता येईल. कारण या वेळी थंडीचा ताण जास्त प्रमाणात असतो.

७) हिवाळ्यात जनावरांना जास्त खाद्य देणे गरजेचे असते, त्यामुळे जनावरांची चयापचय क्रिया वाढते. शरीरात अधिक ऊर्जा उष्णता निर्माण होऊन शरीराचे तापमान नियमित ठेवले जाते. हिवाळ्यात जनावर चरायला जात असतील तर चारण्याच्या ठिकाणी सकस पुरेसा चारा उपलब्ध आहे का ते पहावे. नाहीतर जनावर फिरण्यावर जास्त ऊर्जा वाया जाऊन जनावर जास्त अशक्त होतात.

८) हिवाळ्यात हायब्रीड नेपियर प्रवर्गातील तसेच इतर एकदलीय चारा पिकांची वाढ होत नाही. यामुळे चारा उत्पादनात घट होऊन जनावरांचे कुपोषण होण्याची शक्यता असते. थंडीच्या काळात द्विदल चाऱ्याची वाढ उत्तम होते. म्हणून या काळात द्विदल चारा पिकांची लागवड करून जनावरांच्या आहारात वापर करावा. यामुळे चाऱ्या अभावी होणारे कुपोषण टाळता येईल.

९) वातावरण थंड असल्याने जनावरे पाणी जास्त पीत नाहीत. जनावरांना सकाळी नऊनंतर बाहेर उन्हात ठेवावे. थोडे मीठ, पीठ टाकून पाणी पाजावे. यामुळे पाणी पिण्याचे प्रमाण वाढते. थंडीच्या काळात जनावरांना कोमट पाणी पिण्यासाठी द्यावे. गोठ्यामध्ये उबदारपणा ठेवल्यास जनावर व्यवस्थित पाणी पितात.

१०) जनावरांचा बाह्यपरजीवी कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी गोठ्याची स्वच्छता ठेवावी. निरगुडी, तुळस, गवती चहा यांच्या जुड्या गोठ्यात लटकाव्यात. या वासाने बाह्य परजीवी कीटक गोठ्यात येण्याची शक्यता कमी होते. गोठा स्वच्छतेसाठी कडुलिंबाचे तेल असलेले द्रावण निर्जंतुकीकरणासाठी वापरावे.

कास, सडांचे आरोग्य ः

सडाची त्वचा मऊ राहावी, भेगा पडू नयेत, यासाठी ग्लिसरीनचा वापर करावा. सडाला भेगा पडल्यास तत्काळ उपचार करावेत. दूध दोहनावेळी कास धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा.

हिवाळ्याच्या दिवसात टिट डीप द्रावणामध्ये एनपीई नसावे. एनपीइ नसलेले द्रावण टिट डीपसाठी वापरल्यास सड, कासेची त्वचा ३.४ पटीने मऊ व चांगली राहते. अति थंडीमध्ये सडांच्या टोकांना रक्तप्रवाह कमी होण्याची शक्यता असते.

त्यामुळे जनावर पान्हा सोडत नाही. प्रोपायलीन ग्लायकॉल वापरल्यास फ्रॉस्ट बाइट टाळले जाते. कासेचा इडिमा हा उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात चार पटीने वाढतो. कासेचा इडिमा प्रामुख्याने पहिलारू कालवडीमध्ये आढळून येतो. कासेच्या इडिमामुळे पान्हा व्यवस्थित सुटत नाही. त्यामुळे कासदाह होण्याची शक्यता वाढते.

हिवाळ्यातील आजार ः

१) वाढत्या थंडीमध्ये लाळ्या, खुरकूत, न्यूमोनिया, अतिसार यांसारख्या आजारांचा धोका असतो. या आजारांपासून जनावरांचे रक्षण करायचे असेल तर सर्व प्रथम थंडीपासून संरक्षण करणे महत्त्वाचे आहे.

२) तक्त्यानुसार वेळोवेळी लसीकरण करून घ्यावे. जनावरांना अद्याप लाळ्या खुरकूत, पीपीआर, रक्तस्रावी सेप्टिसिमिया, एन्टरोटॉक्सिमिया, ब्लॅक क्वार्टर आजारांच्या नियंत्रणासाठी लसीकरण केले नसेल, तर करून घ्यावे.

३) सकस आहार द्यावा. त्यांची रोगप्रतिकारशक्ती टिकून राहील याकरिता प्रयत्न करावेत.

४) वातावरण बदलाचा ताण येवू नये म्हणून इलेक्ट्रोलाइट तसेच जीवनसत्त्वयुक्त द्रावण, पावडरचा आहारात वापर करावा.

प्रजोत्पादनाची काळजी ः

हिवाळ्यात जनावरे वितात किंवा माजावर येत असतात. परंतु या काळात अतिथंडीमुळे शारीरिक तापमान सर्वसाधारण राखण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा वापरली जाते. जनावरांना पुरेसा चारा, पशुखाद्य मिळाले नाही तर ऊर्जेच्या कमतरतेमुळे जनावरे प्रभावीपणे माजाची लक्षणे दाखवत नाहीत.

याकाळात असंतुलित आहारामुळे जनावर अडणे, झार अडकणे, जनावरास उठता न येणे अशा समस्या दिसू लागतात. हे सर्व टाळण्यासाठी थंडीमध्ये जनावराचे व्यवस्थित पोषण होण्यासाठी जास्तीचे पशुखाद्य किंवा बायपास फॅटचा वापर करावा. हायब्रीड नेपियर प्रवर्गातील चारा, द्विदल चाऱ्याचा पुरवठा करावा.

कोंबड्यांचे व्यवस्थापन ः

१) शेडच्या दोन्ही बाजूंच्या जाळ्यांना पडदे लावून रात्री व पहाटे थंड हवेच्या वेळी बंद करावे. दुपारी पडदे उघडावेत. शेडमध्ये तापमान नियंत्रणाची सोय असावी.

२) शेडमधील तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअस नियंत्रित राहणे आवश्यक असते. त्यामुळे शेडमध्ये बल्ब, शेगडी किंवा ब्रूडरचा वापर करावा.

३) तापमान बदलामुळे कोंबड्यांवर ताण येऊ नये म्हणून त्यांच्या आहारात इलेक्ट्रोलाइट्‍स, जीवनसत्त्वांचा वापर करावा.

४) अति थंडीमुळे हवेतील आर्द्रता वाढून लिटर, खाद्यामध्ये बुरशीची वाढ होऊन कोंबड्यांना श्‍वसनाचे आजार होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे शेडमधील लिटर स्वच्छ व कोरडे राहील याची खबरदारी घ्यावी.

५) पिण्यासाठी कोमट पाणी पुरवावे. ऊर्जेची गरज वाढल्यामुळे आवश्यकतेनुसार पोषण खाद्य द्यावे.

६) वेळापत्रकानुसार लसीकरण करावे. पुरेशा प्रमाणात औषधे, क्षार मिश्रणे आणि जीवनसत्त्वांचा साठा ठेवावा.

शेळ्या, मेंढ्यांची काळजी ः

१) स्थलांतर करणाऱ्या, रानात शेळी-मेंढी बसविणाऱ्या पशुपालकांनी विशेष खबरदारी घ्यावी. शेळी, मेंढीस बंदिस्त उबदार निवारा मिळेल याची दक्षता घ्यावी.या काळात मेंढ्यांची लोकर कापणी थांबवावी.

२) शेळ्या, मेंढ्यांना रानात बसवले असेल, तर उबदार आच्छादन पांघरावे.

३) शरीरात लवकर ऊर्जा निर्माण होण्यासाठी कर्बोदकेयुक्त खाद्य प्राधान्याने देण्यात यावे. परंतु अॅसिडॉसिस होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

४) वेळापत्रकानुसार लसीकरण करावे. आवश्यक औषधे आणि जीवनसत्त्वांचा साठा ठेवावा.

संपर्क ः डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ८३२९७३५३१४

(पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *