Animal Care : भारत सरकारतर्फे पशुधन आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रातील काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना देण्यात येणारा ‘राष्ट्रीय गोपालरत्न’ पुरस्कार यंदा नाशिक येथील इंडिजिनस फार्मचे संचालक राहुल खैरनार यांना जाहीर झाला आहे.
Nashik News : भारत सरकारतर्फे पशुधन आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रातील काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना देण्यात येणारा ‘राष्ट्रीय गोपालरत्न’ पुरस्कार यंदा नाशिक येथील इंडिजिनस फार्मचे संचालक राहुल खैरनार यांना जाहीर झाला आहे. राष्ट्रीय स्तरावरील देशी गोसंवर्धन क्षेत्रासाठी त्यांना तृतीय क्रमांक मिळाला आहे. दोन लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
श्री. खैरनार यांनी २००२ मध्ये कृषी पदविका पूर्ण केल्यानंतर काही काळ खासगी कंपनीत नोकरी केली. पुढे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात कृषी पदवीसह कृषी व्यवसाय व्यवस्थापन क्षेत्रात पदव्युत्तर पदवी मिळविली. कृषी विस्तार क्षेत्रात काम करताना सेंद्रिय शेती आणि रसायनअंशमुक्त अन्नधान्याची गरज लक्षात आल्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये गीर गोवंश संगोपनाद्वारे दुग्ध व्यवसायाचा पर्याय निवडला.
यासाठी त्यांनी गुजरातमधील विविध गोशाळांना भेटी दिल्या. जुनागढ, गोंडल परिसरात गोसंगोपन व व्यवस्थापनाचा अभ्यास करून व्यवसायाचा विस्तार केला आहे. गुणवत्तापूर्ण दूध, तूप विक्रीसह जातिवंत गीर गोवंश पैदाशीला चालना देण्यासाठी ‘इंडीजीनस अंगव्हेट प्रोड्यूसर कंपनी लि.’ची सुरवात केली. यातून त्यांनी दुग्ध व्यवसायामध्ये वेगळी ओळख तयार केली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे.
हा पुरस्कार केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते आज (ता.२६) पशुवैद्यकीय महाविद्यालय ग्राउंड, गुवाहाटी, आसाम येथे प्रदान करण्यात येईल.
नाशिकचा दुसऱ्यांदा सन्मान
भारतातून दरवर्षी देशी गोवंश संगोपनात उत्कृष्ट काम करणाऱ्या तीन जणांना हा पुरस्कार भारत सरकारकडून प्रदान करण्यात येतो. या आधी हाच पुरस्कार सटाणा येथील तरसाळी येथील इंजि. अनिरुद्ध पाटील यांना प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर आता तर खैरनार यांची निवड झाली आहे.
राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारार्थी असे…
देशी गाय, म्हशींच्या जातींचे संगोपन करणारे सर्वोत्तम दुग्ध उत्पादक शेतकरी:
प्रथम क्रमांक…राम सिंग (करनाल, हरियाना)
द्वितीय क्रमांक…नीलेश मगणभाई अहीर (सुरत, गुजरात)
तृतीय क्रमांक…ब्रिंदा सिद्धार्थ शहा (वलसाड, गुजरात) व राहुल मनोहर खैरनार(नाशिक, महाराष्ट्र)
सर्वोत्कृष्ट डेअरी सहकारी/दूध उत्पादक कंपनी/डेअरी फार्मर प्रोड्युसर संस्था :
प्रथम क्रमांक…पुलपल्ली क्षिरोलपदाका सहकाराना संगम मर्यादित (वायनाड, केरळ)
द्वितीय क्रमांक…टीएम हुसुर दूध उत्पादक सहकारी संघ (मांड्या, कर्नाटक)
तृतीय क्रमांक…एम. एस. नाथाकोविल पट्टी दूध उत्पादक सहकारी संघ (दिंडिगल, तमिळनाडू)
सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ:
प्रथम क्रमांक…सुमन कुमार साह (अरारिया, बिहार)
द्वितीय क्रमांक…अनिल कुमार प्रधान (अनुगुल, ओडिशा)
तृतीय क्रमांक…मुड्डापु प्रसाद राव (श्रीकाकूलम, आंध्रप्रदेश)