पशुधन

Sheep And Goat Management : हिवाळ्यात शेळ्या, मेंढ्यातील आजारांचा प्रादुर्भाव कसा रोखाल?

Sheep And Goat Diseases : शेळी-मेंढीपालन व्यवसायासाठी हिवाळा आरोग्यासाठी पोषक मानला जातो. पण याच काळात म्हणजे थंडीमध्ये आजार लवकर पसरतात कारण जिवाणू व विषाणू थंड तापमानात जास्त वेळ टिकून राहतात.

Sheep And Goat Rearing : शेळी-मेंढीपालन व्यवसायासाठी हिवाळा आरोग्यासाठी पोषक मानला जातो. पण याच काळात म्हणजे थंडीमध्ये आजार लवकर पसरतात कारण जिवाणू व विषाणू थंड तापमानात जास्त वेळ टिकून राहतात. त्यामुळे आजारावर उपचार करण्यापेक्षा ते होऊच नयेत याची खबरदारी घेतली पाहिजे. 

१) आजाराचे मुख्य कारण म्हणजे जिवाणू, विषाणू आणि जंत प्रादुर्भाव. त्यामुळे गोठा जंतुनाशकाने आठवड्यातून १ ते २ वेळा धुवावा. 

२) बाह्य परजीवीची हिवाळ्यात अंधाऱ्या, थंड आणि ओलसर जागेत झपाट्याने वाढ होते. ज्या करडांमध्ये जंत प्रादुर्भाव असेल ती करडे कमकुवत आणि संथ असतात. शरीरातील लोह आणि धातूचे प्रमाण कमी होऊन वजनात घट होते आणि शरीर खंगते. परजीवीमुळे लहान करडांना काही आजार होतात.

३) रक्ती हगवणीमध्ये करडांची वाढ खुंटते किंवा ती अतिसाराने मरण पावतात. आतील आणि बाह्य परजीवीमुळे करडांना शरीराचे तापमान हिवाळ्यात स्थिर राखणे अवघड जाते.

४) जंत हे अन्नद्रव्ये, अन्नरस आणि रक्ताचे शोषण करतात. आतड्यातील अन्नद्रव्ये शोषण करणाऱ्या ग्रंथीना इजा पोहोचवितात. त्यामुळे अनेमिया (पंडुरोग) होतो. आजूबाजूच्या परिसरात चरण्यासाठी गवतावर दव असताना सकाळी सकाळी सोडू नये. कारण या वेळात जंतांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते.

५) करडांना आजार झाल्यावर तो बरा करण्यापेक्षा तो होऊ न देणे अधिक चांगले. म्हणून करडांना ठरल्यावेळी रोगप्रतिबंधक लस आणि जंतुनाशक औषधे द्यावीत. शेळ्यांना लस कधीही आजार आल्यानंतर देऊ नये, कारण आजारी व विशिष्ट साथीमध्ये आजारी शेळीला लस दिल्यास तो आजार बरा न होता बळावतो.

६) हिवाळ्यात करडांवरील पिसू, गोचिड यांचे योग्य वेळेस नियंत्रण करणे आवश्यक आहे. अन्यथा, हे करडांच्या अंगावर, केसांच्या खाली राहून त्यांचे रक्त पितात. यामुळे करडू अस्वस्थ होते आणि त्यांना रक्तक्षय होण्याची शक्यता असते. त्यांच्या चावण्यामुळे खाज सुटते आणि करडू शरीरावर तोंडाने चावा घेते. यामुळे तेथील केस गळणे, जखमा होतात.

उवा, पिसू, गोचीड यांचा उपद्रव टाळण्यासाठी पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने गोचिडनाशकाचा वापर करावा. संपूर्ण अंगावर हे द्रावण लावावे. द्रावण तोंड, डोळे या ठिकाणी लावू नये. हे द्रावण पोटात गेल्यास विषबाधा होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *