maharashtra News

Accident News: ओव्हरटेक करत असतानात धावत्या कारवर आयशर टेम्पो कोसळला अन् काही क्षणातच अख्खं कुटुंबच संपलं

पुणे-नाशिक महामार्गावर रविवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघातात ४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे

राज्यासह देशभरात भीषण अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान पुणे-नाशिक महामार्गावर काल (रविवारी) रात्रीच्या सुमारास भीषण अपघातात ४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या कारवर आयशर टेम्पो कोसळला. ओव्हर टेक करत असताना झालेल्या या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आङे. ही दुर्दैवी घटना संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावाजवळ घडली आहे. या भीषण अपघातानंतर टेम्पो चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सुनील धारणकर (वय 48 वर्ष), आशा सुनील धारणकर (वय 42), ओजस्वी धारणकर (वय 2 वर्ष), आणि अभय सुरेश विसाळ अशी अपघातातील मृत व्यक्तींची नावे आहेत. तर अस्मिता अभय विसाळ या महिलेला ग्रामस्थांच्या मदतीने वाचवण्यात यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे. ते पुण्याहून नाशिकच्या दिशेने निघाले होते. संगमनेर परिसरातून ते जात असतानाच समोरून जात असलेल्या आयशर टेम्पोला कारने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याचक्षणी आयशर टेम्पो कारवर कोसळला

या भीषण अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच चंदनापुरी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य सुरू केले. पोलिसांनी देखील वेळेवर घटनास्थळी धाव घेतल्याने एका महिलेचा जीव वाचवण्यात यश आलं आहे.

मृतांमध्ये दोन पुरुष, एक महिला आणि एका दोन वर्षीच्या चिमुकलीचाही समावेश आहे. या घटनेनंतर नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून तासाभरात वाहतूक सुरळीत केली. या घटनेमुळे हळहळ वक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *