maharashtra News

Ahmednagar: ‘ शहरातील गुंडगिरी मोडीत काढू’, अहमदनगरच्या पदाधिकारी मेळाव्यात संजय राऊतांचं वक्तव्य

Sanjay Raut in Ahmednagar: नगर शहरात जी गुंडगिरी आणि ताबामारी सुरू आहे, त्याच्या विरोधात आता आवाज उठविण्याची वेळ आली आहे. येथील गुंडगिरीविरुद्ध मोर्चा काढून स्वर्गीय अनिल राठोड यांना श्रद्धांजली अर्पण करू. येत्या लोकसभा व विधानसभेच्या माध्यमातून नगर जिल्ह्यामध्ये किमान चार जागांवर भगवा फडकणार आहे, असा विश्‍वास शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

अहमदनगर लोकसभा मतदार संघाच्या पदाधिकारी मेळाव्यात राऊत बोलत होते. याप्रसंगी शिवसेनेचे नगर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे, माजी आमदार विजय औटी, उपनेते साजन पाचपुते, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, उपजिल्हाप्रमुख भगवान फुलसौंदर, संदेश कार्ले, गिरीश जाधव, युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर रोहिणी शेंडगे व सुरेखा कदम आदी उपस्थित होते.

गुंडगिरी हद्दपार करू

नगर जिल्ह्यात शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम आम्ही करीत आहोत. खासदार संजय राऊत यांच्या पुढाकारातून आता नगर जिल्ह्यामध्ये आम्हाला वाटचाल करायची आहे. येथील शिवसैनिक निश्चितच आपले मोठे योगदान देईल. नगरमधील गुंडगिरी थांबविण्यासाठी आपण मोर्चा काढू, जिल्ह्यातून गुंडगिरी हद्दपार करू, असा निर्धार यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी केला.

युवकांचा पक्षप्रवेश

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरातील दोनशेहून अधिक युवकांनी खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. राऊत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. पाथर्डी येथील युवकांनी देखील यावेळी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *