सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्री पाटील (Jayshree Patil) यांची भेट घेतली. मदनभाऊंच्या ‘विजय’ बंगल्यावर चहापान केले. ही केवळ सदिच्छा भेट होती, राजकीय चर्चा काहीच नव्हती, असे त्यांच्या गोटातून सांगण्यात आले. दोनच दिवसांपूर्वी जयश्रीताईंनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर जयंतरावांच्या या चहापानाची चर्चा रंगली आहे.
नव्या वर्षात लोकसभा निवडणूक (Loksabha Elections) तोंडावर आहे. त्यानंतर विधानसभा आखाडा रंगेल. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी गतिमान झाल्या आहेत. नव्या मांडणी होताना दिसत आहे. राज्यातील नव्या समीकरणांत पटावर नवे डाव मांडले जातील. त्यात सांगलीतून श्रीमती जयश्री पाटील यांच्या भविष्यातील भूमिकेबाबत सातत्याने चर्चा होत आल्या आहेत.
त्यांनी दोनच दिवसांपूर्वी अजितदादांची भेट घेतली होती. त्यांची महाराष्ट्र हौसिंग कार्पोरेशनच्या संचालकपदी निवड झाल्याच्या निमित्ताने सदिच्छा भेट होती, असे सांगण्यात आले आहे. परंतु, अजितदादांनी राज्यात स्वतःचा गट बांधत असताना सांगलीतून मदनभाऊ समर्थक सोबत यावेत, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
मदनभाऊंचे काही जुने शिलेदार त्या गटात दाखल झाले आहेत. काही मार्गावर आहेत. अशा वेळी जयंत पाटील यांची महापालिका क्षेत्रातील मोट ढिली पडू शकते. त्या पार्श्वभूमीवर जयंतरावांनी मदनभाऊंच्या घरी दिलेली भेट आणि केलेले चहापान या घडामोडींचा भाग मानला जातोय. जयंतराव आज शहरात आले होते. त्यानंतर ही भेट झाली.