MLA Kiran Lahamate: अकोले तालुक्यात विकासकामांसाठी सतराशे कोटींचा निधी आणला. पिंपरकणे पुलाचे काम झाल्याने डांगी जनावरांच्या प्रदर्शनाला मोठी गर्दी झाली. राज्य व देशपातळीवर सर्वांत मोठे डांगी जनावरांचे प्रदर्शन राजूरमध्ये भरते, असे प्रतिपादन आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केले.
मागील चार वर्षांत कोरोना व लम्पी आजारामुळे प्रदर्शन भरले नाही. यावर्षी चांगले नियोजन केल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला धन्यवाद दिले पाहिजेत, असेही डॉ. लहामटे यांनी सांगितले. राजूर येथील डांगी जनावरे व कृषी प्रदर्शनच्या बक्षीस वितरण समारंभात अध्यक्षस्थानावरून डॉ. लहामटे बोलत होते.
डांगी जनावरांचे परीक्षण करण्यात आले. इगतपुरी तालुक्यातील चॅम्पियन भाऊसाहेब कचरू भोसले व उपविजेता सांगवी येथील धोंडिबा किसन बिन्नर सांगवी यांच्या वळूंना पारितोषिके देण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रथम डांगी वळूस तसेच प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षीस मिळालेल्या जनावरांच्या मालक शेतकऱ्यांना शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दिघे, आदिवासी सेवक ठकाजी कानवडे, सरपंच पुष्पा निगळे, उपसरपंच संतोष बनसोडे, गोकूळ कानकाटे, गंगाराम धिंदळे, स्वप्निल धांडे, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण दातरे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक धिंदळे ॲड. दत्ता निगळे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक पुष्पा निगळे यांनी केले. जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दशरथ दिघे म्हणाले की, डांगी जनावरांचे निपक्षपातीपणे परीक्षण केले. राज्यातील सर्वांत मोठेप्रदर्शन राजूर येथे भरले आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांतील जनावरे येतात. मात्र मार्केटिंग झाले तर स्थानिक रोजगार वाढेल. डांगींचे संगोपन संवर्धन करण्याची गरज आहे.
यावेळी उपसरपंच संतोष बनसोडे, आदिवासी सेवक ठकाजी कानवडे, स्वप्निल धांडे, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण दातरे, शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार विजेते गंगाराम धिंदळे यांनी मनोगत व्यक्त केले.