Pune News : ‘‘भारतात पक्षांतर विरोधी कायदा मजबूत करण्याची गरज आहे,’’ असे मत ज्येष्ठ विधिज्ञ उल्हास बापट यांनी मंगळवारी व्यक्त केले. ‘‘शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीबाबत सर्वोच्च न्यायालयाचे काही मुद्दे मला पटलेले नाहीत.
विधानसभेच्या अध्यक्षांसमोर सुरू असलेल्या प्रकरणाचा निर्णय जर कोणाच्याही विरोधात गेला तर सर्वोच्च न्यायालयात जाता येते. पण न्यायालयही लवकर निर्णय देणार नाही. त्याला दोन महिने लागतील आणि त्यादरम्यान निवडणुका येतील.
अंतिम निर्णय हा जनतेच्या मनातला होणार आहे. एकनाथ शिंदे बरोबर होते की उद्धव ठाकरे, हे जनता ठरवेल,’’ अशी टिप्पणी त्यांनी आमदार अपात्रतेबाबत केली.भारतीय लोकशाही ही संसदीय लोकशाही आहे आणि यात जेव्हा पंतप्रधान अति शक्तिशाली होतात.
तेव्हा या लोकशाहीचे रूपांतर प्राइम मिनिस्ट्रियल सिस्टिममध्ये होते. शक्तिशाली पंतप्रधान असल्यामुळे विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल असो की निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय असो, त्यांच्याबद्दलची विश्वासार्हता कमी होत चालली असल्याची खंत बापट यांनी व्यक्त केली आहे.
‘‘शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात कायद्याने आणि विवेकाने निकाल लागला, तर शिंदे गटाचे आमदार अपात्र होणे अपेक्षित आहे. मात्र तसे होणार नाही,’’ असे मत ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी मांडले.
‘‘मूळात शिंदे गटाने केलेल्या सर्व कृती या पक्षांतर बंदी कायद्यात येतात. कारण राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष या दोन स्वतंत्र व्यवस्था आहेत. राजकीय पक्षाकडून नेमण्यात आलेल्या प्रतोदाने दिलेला पक्षादेश शिंदे गटाने पाळला नाही व विरोधकांबरोबर जाऊन सत्ता स्थापन केली.
या सर्व गोष्टी त्यांना अपात्र करण्यास पुरेशा आहेत. परंतु तसे होण्याची शक्यता नाही. कदाचित विधानसभा अध्यक्षांवर राजकीय दबाव असू शकतो. त्यामुळे निकाल काय लागू शकतो याबाबत अद्यापही स्पष्ट काहीच सांगता येत नाही,’’ असे ते म्हणाले.
‘मुख्यमंत्र्यांची भेट घेणे धक्कादायक’
राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यासमोर आमदार अपात्रता प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अशावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलायचे नाही, हा पहिला नियम आहे. ते कोणत्या अधिकाराने माध्यमांशी बोलत आहेत?, असा सवाल बापट यांनी केला.
विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, हे तर धक्कादायक आहे आणि घटनेच्या कुठल्याच नैतिकतेत बसत नाही. नार्वेकर बुधवारी (ता.१०) काय निर्णय देतील काही सांगू शकत नाहीत, असे उल्हास बापट म्हणाले.