पुढील वर्षी अयोध्येत २२ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावरून राजकारण पेटले आहे. या सोहळ्याचे अधिकृत निमंत्रण काही मोजक्याच विरोधी नेत्यांना देण्यात आले असून त्यातूनही काही नेत्यांना वगळण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे
पुढील वर्षी अयोध्येत २२ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावरून राजकारण पेटले आहे. या सोहळ्याचे अधिकृत निमंत्रण काही मोजक्याच विरोधी नेत्यांना देण्यात आले असून त्यातूनही काही नेत्यांना वगळण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यातून या सोहळ्यासाठी जाणाऱ्या अतिमहत्त्वाच्या नेत्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा समावेश असल्याची चर्चा सुरू झाली असून ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंना मात्र निमंत्रण देण्यात आलेले नाही अशा चर्चा सुरू होत्या. अशातच आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांना निमंत्रण मिळालं नसल्याची माहिती दिली आहे.
मला राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे कसल्याही प्रकारचे निमंत्रण मिळालेले नाही, अशी माहिती एबीपी माझाला दिल्याचे वृत्त आहे. राज ठाकरे यांना राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण दिलेलं आहे असं भाजप नेते गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं.
राज ठाकरेंच्या निकटवर्तींयांनी याबाबतची माहिती दिली असल्याचे एबीपी माझा या वृत्तवाहिनीने म्हटलं आहे.दरम्यान, २२ जानेवारीला हा सोहळा पार पडणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगात रजिस्टर असलेल्या प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रमुखांना निमंत्रण जाणार आहे. काल गिरीष महाजन यांनी राज ठाकरेंना निमंत्रण मिळाल्याचं सांगितलं त्यानंतर त्यांच्या निकटवर्तींयांनी त्यांना अद्याप निमंत्रण मिळालं नसल्याची माहिती दिली आहे.
काय म्हणाले होते गिरीष महाजन?
केंद्राच्या व्हीव्हीआयपी यादीत उद्धव ठाकरे नसतील मात्र राज ठाकरे असतील. अयोद्धेच्या राम मंदीरावरुन आमच्यावर टीका केलीय त्यांना बोलवण्याचं कारण काय? उद्धव ठाकरेंचं अयोद्धेच्या राम मंदिराच्या उभारणीत काय योगदान हे सर्वांना माहिती आहेत. उद्धव ठाकरे हे साधे आमदार आहेत. त्यामुळे केंद्राच्या ‘व्हीव्हीआयपी’च्या यादीत ते नसतील; पण राज ठाकरे यांचा मात्र समावेश असेल.
अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीत उद्धव ठाकरेंचे योगदान काय? घरात बसून भूमिका घेणे आणि प्रत्यक्ष कारसेवा करणे यात फरक आहे. आम्ही वीस दिवस कारागृहामध्ये होतो. तेव्हा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कुठे होते? बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेबाबत दुमत नाही. मात्र जे बोलतायेत ते आयत्या बिळावरचे नागोबा आहेत. असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.