Ayushman Health Card : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यातून ‘आयुष्मान हेल्थ कार्ड’चा नवा पॅटर्न भारतवासीयांना मिळणार आहे. त्याचा प्रारंभ नाशिकच्या काळाराम मंदिरापासून होत असून, धार्मिक स्थळावर प्रसाद म्हणून त्याचा प्रसार होणार असल्याची माहिती आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे यांनी दिली.
‘आयुष्मान हेल्थ कार्ड’ योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. जनतेला या योजनेत सहभागी करून घेण्यासाठी व्यापक नियोजन केले जात आहे.
नव्या वर्षात या उपक्रमात अनेक मोठे बदल करण्यात येणार असून, सर्वसामान्यांपर्यंत आणि समाजातील प्रत्येक घटकाला योजनेचा लाभ मिळावा, यासाठी जास्तीत जास्त नागरिकांच्या घरात आयुष्मान हेल्थ कार्ड पोचविण्याचे मिशन हाती घेण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत धार्मिकस्थळी भाविकांची होणारी गर्दी पाहता ज्यांच्याकडे आयुष्मान हेल्थ कार्ड नसेल, अशा भाविकांना मंदिरातच हेल्थकार्ड देण्याची संकल्पना तयार केली आहे.
मंदिर परिसरात यासाठी कक्ष उभा केला जाणार असून, येणाऱ्या प्रत्येक भाविकाची माहिती घेऊन मंदिरात जातानाच त्यांची नोंदणी केली जाणार आहे. मंदिरात भाविक दर्शन घेतल्यानंतर त्यांना मंदिरातून बाहेर पडण्यापूर्वीच त्यांच्या मोबाईलमध्ये आयुष्मान हेल्थ कार्ड जनरेट होणार आहे.
नाशिकमधील श्री काळाराम मंदिराप्रमाणेच त्र्यंबकेश्वर मंदिरातही अशाप्रकारची व्यवस्था केली जाणार असून, महाराष्ट्रातील नागरिकांचे हेल्थ कार्ड काढण्यासाठीचे नियोजन करण्यात येणार आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन शक्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर येणार असून, श्री काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहेत. त्यामुळे याचवेळी या योजनेचा प्रारंभ जाहीर केला जाणार आहे. शक्य झाल्यास मोदींच्या हस्ते ऑनलाइन उदघाटन करण्यासाठीही प्रयत्न केला जाणार आहे.