शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये आमदार भरत गोगावले यांनी सुरत मोहिमेबद्दल बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला दिला होता.
नागपूरः शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये आमदार भरत गोगावले यांनी सुरत मोहिमेबद्दल बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला दिला होता. त्यावरुन काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
‘तुम्ही सुरतच का निवडलं?’ या कामत यांच्या प्रश्नावर गोगावले यांनी ‘सुरत हे चांगलं ठिकाण आहे, असं मी ऐकलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज सुरतला गेले होते’ असं उत्तर दिलं होतं. त्यावरुन बुधवारी काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी गोगावलेंचा कान पिळला आहे.
थोरात म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचं सुरतला जाणं हे स्वराज्यासाठी होतं आणि यांचं मात्र स्वतःसाठी आहे. रोहित पवारांच्या आंदोलनाविषयी बोलताना ते म्हणाले, ते ८०० किमी चालत आले होते. त्यामुळे एक वरिष्ठ मंत्री चर्चेला जाणं आवश्यक असतं.. पण कोणी गेलं नाही. त्यामुळे भावना आवरता आल्या नाहीत.
गोगावले-कामतांचा संवाद
कामत : तुम्ही सुरतला पोहोचला, तेव्हा तिथे इतर आमदार आधीच उपस्थित होते का?
गोगावले : नाही.
कामत : तुम्ही सुरतला पोहोचल्यानंतर बाकीचे आमदार तुमच्या मागून सुरतला पोहोचले का?
गोगावले : मी पहिलाच गेलो, उर्वरित आमदार हे मी ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो तिथे आले.
कामत : जे आमदार तुमच्या मागून सुरतला आले, त्यांना तुम्ही कळवले होते का? की त्यांना तुमच्या आधीच त्या ठिकाणी यायचे माहिती होते?
गोगावले : याबाबत मला माहिती नाही. परंतु मी तिथे गेल्यानंतर, ते तिथे आले आणि त्यांची आणि माझी भेट झाली.
कामत : सुरत मधील एकाच हॉटेलमध्ये सर्व आमदारांनी जमणे, हा योगायोग नव्हता; तर हा पूर्वनियोजित कार्यक्रम होता. हे बरोबर आहे का?
गोगावले : ते मला माहित नाही. ते तिकडे कसे आले हे त्यांनाच माहीत असेल. छत्रपती शिवाजी महाराज तिकडे गेले होते, म्हणून मला वाटलं ते चांगलं ठिकाण असणार म्हणून मी तिकडे गेलो.
कामत : आपल्यासोबत इतर सर्व आमदार सुरतवरून गुवाहाटीला गेले का?
गोगावले : होय आम्ही गुवाहाटीला गेलो
कामत : तुम्ही स्वतःची व्यक्तिगत तिकीट काढले होते का? की कुणी काढली होती.
गोगावले : आम्ही स्वतःच्या खर्चाने गेलो. कामाख्या देवीचे दर्शन स्वतःच्या पैशाने घेणे उचित आहे.