राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर सभेत शिवीगाळ केल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. शिवसेना नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर शिवसैनिक व कार्यकर्त्यांनी भांडुप पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी केली. यावेळी संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
ठाकरे गटनेते दत्ता दळवी यांच्या अटकेनंतर ठाकरे गटनेते खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी दळवींना पाठिंबा देत काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. दत्ता दळवींनी वापरलेला तो शब्द धरमवीर या चित्रपटात वापरला आहे. धरमवीर चित्रपटात वापरण्यात आलेला शब्द सेन्सॉर बोर्डाने हटवला नाही. तो शब्द चुकीचा असेल तर चित्रपट निर्मात्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. त्याचवेळी आम्ही सर्व दत्ता दळवी यांच्यासोबत आहोत, असेही राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी दळवींनी उच्चारलेले शब्द पुन्हा एकदा उच्चारले आहेत. त्याचबरोबर धर्मवीर चित्रपटात ही शिवी वापरली जाऊ शकते. तर मग दळवींच्या विधानावर आक्षेप का? शिंदे गट हे मुद्दाम करत आहे, असं संजय राऊत म्हणाले.
काय आहे प्रकरण?
शिवसेना उबाठा गटातर्फे रविवारी भांडुपमध्ये ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या ‘हिंदुह्रदयसम्राट’ या उपमेवरून माजी महापौर दत्ता दळवी यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
सार्वजनिक सभेत संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अश्लील शिवीगाळ व अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना शिंदेगटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी भांडुप पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार भांडुप पोलिसांनी माजी महापौर दत्ता दळवी यांच्या विरोधात भादवी कलम १५३(अ),१५३ (ब),१५३(अ)(१)सी, २९४, ५०४,५०५(१)(क) अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.