maharashtra News

Dharashiv News : सरत्या वर्षात १६९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

धाराशिव : सरत्या वर्षात धाराशिव जिल्ह्यातील एकशे ६९ शेतकऱ्यांनी आत्महत्येद्वारे मरणाला कवटाळल्याची धक्कादायक आकडेवारी सरकारी नोंदीतून समोर आली आहे. सततची नापिकी, वाढणारा खर्च आणि कर्जबाजारी झाल्याने या आत्महत्या होत असल्याचे सांगितले जाते. जानेवारी २०२३ ते नोव्हेंबर २०२३ या अकरा महिन्यातील ही आकडेवारी आहे.

यावरून दर दोन दिवसाला एक शेतकरी आत्महत्येची नोंद जिल्ह्यात होत असल्याचे विदारक सत्य समोर आले आहे. जानेवारी ते जुलै या कालावधीतील ८० शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबे मदतीस पात्र ठरली आहेत. तर १८ कुटुंबे अपात्र ठरली आहेत. जुलै ते नोव्हेंबर या कालावधीतील साठ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबे आणखी सरकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहेत. चौकशीवरून पात्र अपात्र कुटुंबे ठरणार असून त्यातील किती कुटुंबे मदतीस पात्र होतील हा प्रश्न अद्याप शासकीय फायलीत अडकून राहिला आहे. परिणामी त्यांना अद्याप शासकीय मदत मिळू शकलेली नाही.

मदतीचा हात पुढे करावा

सरत्या वर्षात दर दोन दीवसाला एक शेतकरी आत्महत्या होत असल्याचे हे विदारक चित्र समोर आले आहे. कुटुंबातील कर्ता गेल्याने या शेकडो कुटुंबाला जीवनाच्या लढाईत आर्थिक विवंचनेचा सामना करत, खडतर जीवन जगावे लागते आहे. यातील अर्ध्यापेक्षा अधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे अद्यापही शासकीय मदतीपासून वंचित आहेत. त्यांना लवकरात लवकर शासनाने मदतीचा हात पुढे करावा. अशी भावना सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *