Dhule Fake Doctor : वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना जिल्ह्यातील गावागावांमध्ये दवाखाने थाटून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या सात बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या पुढाकाराने झालेल्या या कारवाईचे स्वागत होत आहे.
अशा निर्भीड कारवाईमुळे विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
विनापरवाना दवाखाने थाटून बोगस पद्धतीने वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध पोलिस प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना यथोचित कारवाईची सूचना दिली.
पिंपळनेर येथे कारवाई
पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी साक्री तालुक्यातील वार्सा येथील चौफुलीजवळील असी तबसुम विश्वास (वय ५०, रा. वार्सा), शेवडी येथील संभाजी माधवराव सोनवणे (वय ७०, रा. उमरे, ता. साक्री), पिंपळनेर येथे महावीर भवनाजवळील गोपाळनगर येथे योगेश चंद्रकांत पाटील (वय २४, रा. पिंपळनेर) व राकेश प्रकाश पाटील (वय २८, रा. पिंपळनेर) यांच्यावर कारवाई केली.
शिरपूर येथे तपासणी
शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाट यांनी बोराडी येथील विजयसिंग धुडकू बडगुजर (वय ५२, रा. बन्सीलालनगर, शिरपूर), शिरपूरचे पोलिस निरीक्षक अन्साराम आगरकर यांनी शिरपूर शहरातील साई क्लिनिक येथील डॉ. धीरज रोहिदास अहिरे (वय ३३) यांच्यावर कारवाई केली.
तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक कापडणीस यांनी सोनगीर येथून डॉ. समर विजय बिसवास (वय ४७, रा. अकोला, पश्चिम बंगाल, ह. मु. सोनगीर, ता. धुळे) याच्यावर कारवाई केली.
विविध साहित्य जप्त
गुन्ह्यातील बोगस डॉक्टरांकडून अॅलोपॅथीची औषधे आणि इंजेक्शन, गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला. सातही बोगस डॉक्टरांविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात कुठेही विनापरवाना दवाखाने थाटून वैद्यकीय व्यवसाय करणारे बोगस डॉक्टर आढळल्यास तत्काळ पोलिस प्रशासनाकडे तक्रार करावी. तक्रार देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलिस अधीक्षक धिवरे यांनी केले.
ॲलोपॅथी, होमिओपॅथीचे उपचार
शिरपूर: बोराडी व जुने भामपूर येथे दोन वेगवेगळ्या दवाखान्यांवर छापा टाकत आरोग्य विभाग आणि पोलिसांनी बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई केली. बोगस डॉक्टर अॅलोपॅथी व होमिओपॅथीचे उपचार करताना आढळले.
जुने भामपूर येथील साई क्लिनिकवर सहाय्यक तालुका आरोग्याधिकारी डॉ. राष्ट्रपाल अहिरे, डॉ. सूरज पावरा, पोलिस उपनिरीक्षक छाया पाटील, सुरेश सोनवणे, हवालदार नंदाळे, रोकडे, प्रभाकर भिल आदींनी छापा टाकला.
संशयित बोगस डॉक्टर धीरज रोहिदास अहिरे (रा. तोरखेडा, ता. शहादा) याच्याकडे पदवीबाबत विचारणा केली असता, त्याने नाशिक येथील मोतीवाला होमिओपॅथी महाविद्यालयातून पदवी मिळवल्याचे सांगितले.
मात्र संशयिताकडे कोणतेच पदवी प्रमाणपत्र किंवा वैद्यकीय परवाना आढळला नाही. त्याच्याविरुद्ध डॉ. अहिरे यांनी फिर्याद दिली. बोराडीत सुदर्शन इलेक्ट्रोहोमिओपॅथी नामक दवाखाना टाकून तेथे प्रॅक्टिस करणारा बोगस डॉक्टर विजयसिंह बडगुजर जाळ्यात अडकला. त्याच्या दवाखान्यातूनही औषधी, इंजेक्शन्स जप्त करण्यात आले.