शिंदखेडा तहसील विभागात महसूल व गौणखनिज वसुलीचे प्रमाण अत्यल्प असल्याने दिलेला वसुलीचा इष्टांक शंभर टक्के पूर्ण करून वसुलीच्या इष्टांक पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे.
कुणीही कामात कुचराई करू नये, असे शुक्रवारी (ता. ५) सकाळी आकराच्या सुमारास शिंदखेडा येथील तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले.
शिंदखेडा येथील तहसील कार्यालयात शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकरी गोयल यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील महसूल मंडळ अधिकारी व तलाठी यांची सयुक बैठक घेण्यात आली. बैठकीत जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी तालुक्यातील महसूल मंडळनिहाय कामकाजाचा आढावा घेतला.
तालुक्यातील जमीन महसूल व गौणखनिज वसुलीबाबत दिलेले इष्टांक पूर्ण करण्याबाबत सूचना देत चुकीची माहिती देणाऱ्या महसूल मंडळ अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
शिंदखेडा तालुक्यात महसुलीचा वसुली इष्टांक चार कोटी ४५ लाख असून, आजपावेतो दोन कोटी ७० लाख वसुली करण्यात आली आहे. सरासरी ५२ टक्के जमीन महसुलाची वसुली झाली आहे. वसुली शंभर टक्के करणे आवश्यक असल्याची सूचना देण्यात आल्या.
गौणखनिज वसुली इष्टांक सहा कोटी ९९ लाख असून, आजपावेतो तीन कोटी नऊ लाख रुपये वसुली ४५ टक्के करण्यात आली आहे, अशी माहिती या वेळी बैठकीत देण्यात आली. शिंदखेडा महसूल विभागाचा जमीन महसूल व गौणखनिज वसुली इष्टांकापेक्षा फक्त पन्नास टक्के झाली असल्याचे निदर्शनात आले आहे.
दोंडाईचा अपर तहसील कार्यालयाला जमीन महसुलीचा इष्टांक दोन कोटी ९३ लाख देण्यात आला असून, यापैकी दोन कोटी ८५ लाख रुपये वसुली करण्यात आली आहे.
गौणखनिज तीन कोटी ३५ लाख वसुलीचा इष्टांक दिला असून, एक कोटी ४० लाख आजपावेतो वसूल करण्यात आली असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली आहे.
दोंडाईचा अपर तहसील कार्यालयात जमीन महसूल इष्टांक जवळपास पूर्ण झाला असून, गौणखनिज इष्टांक मात्र फार कमी असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे शिंदखेडा महसूल विभाग व दोंडाईचा अप्पर तहसील महसूल विभागाने जमीन महसूल व गौणखनिज वसुलीच्या बाबत अधिक सक्तीने कारवाई करण्याची आवश्यकता असल्याच्या सूचना जिल्हाधिकारी गोयल यांनी दिल्या.
मतदार नोंदनीची पाहणी
जिल्हाधिकारी गोयल यांनी निवडणूकविषय कामकाजाची पाहणी करून दुबार मतदारांचे नाव वगळणे, नवीन मतदारांची नोंदणी, मतदारांचे नाव कमी करणे याबाबत काय कार्यवाही करावी, याबाबत सूचना करीत मार्गदर्शन केले. आगामी काळात निवडणूक होणार असून, यासाठी खबरदारी घेण्याबाबत मार्गदर्शन केले.
सकाळी अकरला सुरू झालेली बैठक दुपारी अडीचपर्यंत सुरू होती. या वेळी अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, शिरपूर उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे, तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, दोंडाईचा प्रभारी अप्पर तहसीलदार घोलप, नायब तहसीलदार बी. डी. वाडीले, निवडणूक नायब तहसीलदार नितेंद्रसिंह राजपूत, संजय राणे आदी उपस्थित होते.
चिलाणे महसूल मंडळ अधिकारी अशोक भामरे यांनी जमीन महसुल वसुलीबाबत चुकीची माहिती दिल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी गोयल यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजविण्याचे आदेश दिले.