नाशिक : धकाधकीचे जीवन जगताना पावलोपावली जाणवणारा ताणतणाव, व्यसनाधिनता व इतर विविध कारणांनी हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. डॉक्टरांनी नोंदविलेल्या निरीक्षणानुसार हृदयविकाराचे निदान झालेल्या रुग्णांमध्ये वयवर्षं २५ ते ४० दरम्यानच्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक राहाते आहे.
चिंताजनक बाब म्हणजे हृदयविकाराचा झटका येण्याचे व त्यामुळे रुग्ण दगावण्याच्या प्रमाणातही वाढ झाली असल्याचे जाणकारांनी सांगितले.
जीवनशैलीतील बदलांमुळे विविध व्याधींचे प्रमाण वाढते आहे. यामध्ये प्रामुख्याने हृदयविकाराचे प्रमाण सर्वाधिक राहात आहे. पूर्वी वयाची पन्नाशी ओलांडली तर उतारवयामध्ये हृदयविकाराचे निदान व्हायचे.
परंतु गेल्या काही वर्षांमध्ये हृदयविकार जडणाऱ्या रुग्णांमध्ये २५ वर्षांपुढील रुग्णांचा समावेश झालेला आहे.
बऱ्याच वेळा वेळीच हृदयविकाराचे निदान होत नसल्याने गुंतागुंत वाढत थेट हृदयविकाराच्या झटक्यापर्यंत जोखीम अनेक रुग्णांमध्ये वाढते आहे. त्यामुळे वेळीच सावध होण्याची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
यामुळे वाढतेय प्रमाण…
हृदयरोग वाढण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाढता ताणतणाव कारणीभूत आहे. त्यापाठोपाठ व्यसनाधिनता, व्यायामाचा अभाव, जंक फूडचे सेवन यांचा समावेश आहे. काही रुग्णांमध्ये अनुवंशिकतेमुळे हृदयरोग उद्भवण्याचा धोका असतो.
मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टरॉलची वाढलेली पातळी (डिसलिपीडीमिया) यामुळेदेखील हृदयविकाराचा धोका बळावत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
बऱ्याच वेळा ॲसिडिटी, स्नायूंचे दुखणे समजून हृदयविकाराकडे दुर्लक्ष होते, व या गोंधळात ‘गोल्डन अव्हर’ निघून गेल्यानंतर हृदयाची अपरिमित हानी होत असल्याचेही जाणकारांचे म्हणणे आहे.
कोलेस्टेरॉलच्या पातळीची भारतीयांसाठी लवकरच निश्चिती
सध्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानांकनांनुसार कोलेस्टेरॉलचा स्तर सामान्य असलेल्या भारतीयांमध्येदेखील हृदयविकार आढळून येत आहे.
त्यामुळे भारतीयांच्या शारीरीक रचनेला अनुसरून कोलेस्टेरॉलचा आदर्शवत स्तर काय असावा, याची निश्चिती करून तसे मानांकन लवकरच जाहीर केले जाण्याची शक्यता जाणकारांनी वर्तविली आहे.
असा टाळा हृदयविकाराचा धोका..
किमान दैनंदिन तीस ते चाळीस मिनिटांचा व्यायाम करावा. यामध्ये चालणे, पोहणे, सायकलिंग हे व्यायाम उत्तम ठरतील. व्यसनांच्या आहारी जाऊ नये, जंक फूड व बेकरी पदार्थांचे सेवन टाळावे.
फळांमध्ये ॲन्टी ऑक्सिडंट असल्याने आहारात फळांचा समावेश असावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नियमित तपासणी करून हृदयरोगापासून बचाव करता येऊ शकतो.
“गेल्या काही वर्षांमध्ये कमी वयात हृदयविकाराचे निदान होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. २५ ते ४० वयोगटातील रुग्णांची संख्या अधिक राहाते आहे. नुकताच अठ्ठावीस वर्षीय युवकाची ॲन्जीओप्लॅस्टी केली. हृदयरोगांपासून बचावासाठी सुदृढ जीवनशैली, व्यायाम आणि पोषक आहार ही त्रिसूत्री अवलंबावी. नियमित तपासणी करत हृदयविकाराला दूर ठेवावे. वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.”