पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी इंडिया आघाडीला बळकट करण्यास वंचित बहुजन आघाडी तयार आहे; मात्र आघाडीत सामील होण्यासाठी औपचारिक पत्राची अपेक्षा आहे. समान अजेंडा असलेल्या संभाव्य राजकीय मित्रांनी कागदावर निमंत्रण द्यायला नको काय, असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला असल्याचे विश्वसनीयरीत्या समजते.
वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक उद्या (ता. २६) विदर्भात आयोजित करण्यात आली आहे. आंबेडकर विविध पर्यायांचा विचार या बैठकीत कार्यकर्त्यांसमोर ठेवणार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप कोणताही प्रस्ताव आमच्यापर्यंत पाठवला नसल्याचे प्रकाश आंबेडकरांनी बोलताना स्पष्ट केले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इंडियातील नेत्यांकडे ‘वंचित’च्या समावेशाबद्दल पाठपुरावा सुरू ठेवला आहे. काँग्रेसनेते राहुल गांधी आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी स्वत: उद्धव ठाकरे याविषयी बोलले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यासंबंधांत पावले उचलावीत, अशीही शिवसेनेची अपेक्षा असल्याचे समजते. प्रकाश आंबेडकर यांनी यासंबंधात उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद सुरू ठेवला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते याबाबत काहीही का बोलत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी केला आहे. या दोन्ही पक्षांना जर वेगळा विचार करीत ‘वंचित’ला सामावून घ्यायचे नसेल तर आपण अर्ध्या-अर्ध्या जागा लढू आणि लोकसभेत भाजपला रोखू, असा त्यांचा प्रस्ताव आहे.
…
… तर ‘मविआ’ला फटका बसेल
गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रातील तब्बल १० मतदारसंघांत क्रमांक दोनवर होती. एमआयएमने आता वंचितशी काडीमोड घेतला असला तरी आंबेडकर आजही मोठी शक्ती आहेत. त्यांना समवेत घेतले नाही तर मविआच्या उमेदवारांना फटका बसू शकेल, असा उद्धव ठाकरे यांचा अंदाज आहे.