कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीला (Loksabha Election) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणून सामोरे जायचे आहे, मात्र सच्चा कार्यकर्त्याला उमेदवारी द्या. ‘बेंटेक्स’ उमेदवार नको, अशी भूमिका महाविकास आघाडीच्या बैठकीत सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.
शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि खासदार अनिल देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. सतेज पाटील यांनी प्रास्ताविक केले. यामध्ये त्यांनी बैठकीचा उद्देश विशद केला. लोकसभेच्या निवडणुकीला आपण महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाणार आहोत.
तसेच जिल्ह्यातील दोन्ही खासदार महाविकास आघाडीचे निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महाविकास आघाडीचे निमंत्रक म्हणून आमदार सतेज पाटील यांनी काम करावे. तसेच अन्य पक्षाच्या प्रमुखांनी सहनिमंत्रक व्हावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
या बैठकीला शिवसेना (ठाकरे गट) संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार जयश्री जाधव, ऋतुराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले, भाकपचे उदय नारकर, दिलीप पवार, सतीशचंद्र कांबळे, शेतकरी कामगार पक्षाचे शहर सरचिटणीस बाबूराव कदम, ब्लॅक पँथरचे अध्यक्ष सुभाष देसाई यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
आधी पक्ष मग उमेदवार
सतेज पाटील म्हणाले, ‘लोकसभेच्या जागा वाटपाचा निर्णय राज्यपातळीवर होईल. कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळाणार हे निश्चित झाले की लगेचच उमेदवारही ठरेल. पुढील सात ते आठ दिवसांत सर्व चित्र स्पष्ट होईल. आपण सर्वांनी एकसंधपणे प्रचार केल्यास विजय निश्चित आहे.’
संविधानाच्या रक्षणासाठी भाजपला हरवा
आदित्य ठाकरे म्हणाले, ‘जर लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला, तर देशाचे संविधान बदलले जाईल. म्हणून लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी भाजपचा पराभव करणे आवश्यक आहे.’