मुंबईः मुंबईतल्या महानंद दूध संघाच्या २७ एकर जमिनीवर गुजरात लॉबीचा डोळा असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना महानंदच्या पाठिशी खंबीरपणे उभी असून असा प्रकार होऊ देणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
संजय राऊत पुढे म्हणाले की, एका परझणे नावाच्या व्यक्तीच्या मध्यस्थीने महानंदची जमीन घशात घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. इकडे महानंदच्या कर्मचाऱ्यांना चार महिन्यांपासून पगार नाहीये, अंगणवाडी सेविकांना पेन्शन दिली जात नाही. दुसरीकडे मात्र सरकारी जमीन गुजरात लॉबीच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला जातोय.
राऊत म्हणाले, महानंदची जमीन मुंबईतल्या प्राईम लोकेशनवरची आहे. गुजरात लॉबीसोबत सौदा करुन महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना काय मिळणार? असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला. महानंद संस्था आणि तिची जमीन टिकवण्यासाठी शिवसेना लढा देणार असल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, संजय राऊतांनी बुधवारीदेखील यासंदर्भात आवाज उठवाला होता. त्या आरोपांना मंत्री विखे पाटलांनी उत्तर दिलं होतं. ते म्हणाले होते की, महानंदचा कारभार गुजरामध्ये जाणार, हे चुकीचं आहे. महानंद एनडीडीबीच्या ताब्यात देणार नाही. मुळात महानंद ही डबघाईला आलेली संस्था आहे. गैरव्यवस्थापनामुळे संस्था अडचणीत आलेली असून राज्यातील प्रमुख दूध संघाला चालवण्यासाठी विनंती केली होती.
”एनडीडीबी गुजरातची संस्था नाहीये. त्यांच्या ताब्यात आपण महानंद संस्था देणार नाहीत. जेव्हा जळगाव संघ डबघाईला आला होता तेव्हा एनडीडीबीने चालवला आणि नफ्यात आणला. तो परत सरकारला मिळाला.” असं स्पष्टीकरण विखे पाटलांनी बुधवारी दिलं. आता सरकार महानंदच्या बाबतीत काय निर्णय घेणार, हे येत्या काळात कळेलच.