मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला अल्टिमेटम काही दिवसांनी संपणार आहे. २४ डिसेंबर तारखेवर जरांगे ठाम आहेत, पण सरकार त्यांना आणखी वेळ मागताना दिसत आहे.
मुंबई– मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला अल्टिमेटम काही दिवसांनी संपणार आहे. २४ डिसेंबर तारखेवर जरांगे ठाम आहेत, पण सरकार त्यांना आणखी वेळ मागताना दिसत आहे. भाजप नेते प्रविण दरेकर यांनी यासंदर्भात जरांगे पाटील यांना विनंती केली आहे. इतके दिवस थांबलात आता आणखी थोडे दिवस थांबा. शाश्वन आरक्षण मिळेल, असं दरेकर म्हणाले.
सापडलेल्या नोंदी पुरावे म्हणून ग्रहित धरल्या जाणार आहेत. १९६७ पूर्वीच्या नोंदी पाहून त्याआधारे दाखले मिळायला लागतील. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितंलय की, विशेष अधिवेशन घेणार आहोत. आणि कोर्टात टिकेल असं आरक्षण आम्ही देऊ. याच्यापेक्षा आणखी स्पष्ट काय हवं आहे. त्यामुळे घाई करणे योग्य नाही, असं ते म्हणाले.घाईगर्दी करुन अध्यादेश किंवा विधेयक आणून आरक्षण दिलं आणि उद्या ते कोर्टात टिकलं नाही तर सरकारवर आरोप होईल. सरकारने फसवणूक केली असा अर्थ होईल. त्यामुळे मराठा समाजाची दिशाभूल सरकारला करायची नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे पदस्पर्श करुन मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय. ते पाळण्याचं आश्वासन त्यांनी अधिवेशनात दिलं आहे, असं ते म्हणाले.
जरांगे पाटील आग्रही आहेत. ते मराठा समाजासाठी प्रामाणिकपणे लढत आहेत. त्याबाबत आमचा त्यांना पाठिंबा आहे. पण, हा देश, राज्य कायद्याने चालतो. कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण दिलं नाही तर उद्या समाजाची दिशाभूल होईल. त्यामुळे त्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. मराठा समाजाचा लढा अंतिम टप्प्यात आलाय, असं दरेकर म्हणाले.
अशावेळी घाईगडबडीत काही पदरात पाडून घेण्यापेक्षा. इतके दिवस गेलेत तर आणखी थोडे दिवस सरकारला देऊन शाश्वत आरक्षण मिळवण्यासाठी धीरानं संयमाने घ्यायला हवं. घाईगर्दीत एवढं उभा केलेलं आंदोलन भरकटू नये किंवा निष्प्रभ ठरु नये याचा त्यांनी विचार करावा ही माझी विनंती आहे, असं ते म्हणाले.