घर जावई होण्यास तरुणांची आणि घरजावई करून घेण्याची पालकांची आजही सहज अशी मानसिक तयारी नाही. परंतु, सद्यःस्थितीत लग्नासाठी मुलीच मिळत नसल्याने आणि मिळाल्या तर त्यांच्या अपेक्षांना विवाहेच्छुक उतरू शकत नसल्याने मुले आता तडजोडीला तयार होत आहेत. दौंड येथे झालेल्या वधू-वर परिचय मेळाव्यात ‘मी घरजावई व्हायला तयार आहे, फक्त तुम्ही स्थळ सुचवा, अशी कळकळीची विनंती दौंड तालुक्यातील एका ३४ वर्षीय तरुणाने करून तडजोडीची तयारी दर्शविली आहे.
दौंड-नगर महामार्गावरील योगराज पॅलेस येथे सेवानिवृत्त फौजदार रामचंद्र घाडगे व जितेंद्र मगर यांच्या पुढाकाराने मराठा समाजातील अविवाहित, उच्चशिक्षित, घटस्फोटित, विधवा व विधूर यांच्याकरिता वधू- वर परिचय मेळावा घेण्यात आला होता. त्यात विवाहेच्छुक तरुणाने घर जावई होण्याची तयारी दर्शविली तरीही त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
सकल मराठा समाजाने मराठा सोयरिक या संस्थेच्या सहकार्याने घेतलेल्या या मेळाव्यात एकूण २२४ जणांनी नावनोंदणी केली. त्यामध्ये फक्त १९ मुलींची नावनोंदणी होती. मेळाव्यासाठी मुले पालकांसह उपस्थित होते, तर मुलींचे फक्त पालक उपस्थित होते. २२ ते २५ वयोगटातील विवाहेच्छुक तरुणांसह विविध कारणांमुळे बिनलग्नाचे राहिलेले ३२ ते ३५ वयाचे तरुण आणि पत्नीचे निधन झाल्याने अथवा घटस्फोट झालेले ४० ते ४५ वयोगटातील विधूर मेळाव्यात सहभागी झाले होते.
कमी शेती, कमी शिक्षणाचा फटका
या मेळाव्यातील बहुतांश मुले हे शेती करणाऱ्या कुटुंबातील होती. सिंचन सुविधा असल्या, तरी शेती ही पावसावरच अवलंबून असल्याने शेती करणाऱ्या व कमी जमीन धारणा असणाऱ्या मुलांना नकार होता. त्याचबरोबर मुले दहावी किंवा बारावीच्या बोर्ड परीक्षेत एखाद्या विषयात नापास झाले; तर पुन्हा परीक्षा देत नाही. त्याचा फटका त्यांना आता लग्न जमविताना होत आहे. मुलाची घरची आर्थिक परिस्थिती बरी असली, तरी त्यांचे शिक्षण नसल्याने पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या मुली त्यांना स्पष्ट नकार देत असल्याचे पाहावयास मिळाले.
मेळाव्यातील निरीक्षणे
- मुलांमधील उच्च शिक्षणाचा अभाव
- उपवर मुले आणि पालकांकडे आर्थिक नियोजन नाही
- काही उपवरांना २२ ते २५ वयोगटातील मुली हव्या आहेत.
- बदनामीच्या भीतीने विधवा/घटस्फोटितांबरोबर लग्नास नकार
- गावाप्रमाणे शहरी व निमशहरी भागातली मुले पण रखडलेलीच
- बागायतदारांनी मुलांच्या लग्नासाठी तालुक्याच्या ठिकाणी फ्लॅट घेतले आहेत
- एकुलत्या मुलाला मुलींची पसंती, पण मुलाचे आई-वडील सोबत नकोत अशी भावना
विधवा, घटस्फोटितांचा विचार करा
ज्या विवाहेच्छुकांचे वय ३० पेक्षा अधिक झालेले आहे, अशा मुलांनी लग्नासाठी विधवा, घटस्फोटित आणि कोरोना काळात विधवा झालेल्यांचा विचार करावा. अन्यथा त्यांचे लग्न होणे अवघड आहे, अशी भीती संस्थेचे संस्थापक अशोक कुटे यांनी व्यक्त केली.