ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी झाल्यानंतर राज्यात राजकीय वाद पेटला आहे. भाजपने नवाब मलिक यांना सत्तेत सहभागी करुन घेण्याच्या मुद्द्यावर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र देखील लिहीलं. दरम्यान या मुद्द्यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले की, भाजप हा नैतिकतेचे फुगे फुगवतो, यांच्याकडे नैतिकता औषधाला तरी शिल्लक आहे का? यांच्या नैतिकतेचं ऑडिट केलं पाहिजे. नवाब मलिक प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहीण्याचा ड्रामा केला. मग ते प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी का नाही?
दोघांचे अपराध सारखे आहेत, दोघांवर ईडीने कारवाई केली, या दोघांचे दाऊदशी संबंध दाखवण्यात आले, दोघांनी दाऊदच्या हस्तकांकडून प्रॉपर्टीज खरेदी केली. पण प्रफुल्ल पटेल हे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि देवेंद्र फडणवीस सांगत आहेत की आम्ही नवाब मलिक यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाहीत, मग कशाला काय लावताय तुम्ही? असेही संजय राऊत म्हणाले.
अन्यथा आम्ही नावे सांगू…
ससून ड्रग्ज प्रकरणात सुरू असलेली नाटक बंद करा. या प्रकरणात दोन कॅबिनेट मंत्र्यांचा थेट सहभाग आहे. हे दोन्ही मंत्री शिंदे गटाचे आहेत. ललित पाटील याला तुरुंगातून ससूनमध्ये आणून वर्षभर त्याची बडदास्त ठेवण्यापर्यंत, त्याच्या ड्रग्ज साम्रज्याला प्रोटेक्शन देण्यापर्यंत दोन शिंदे गटाच्या मंत्र्यांचा सहभाग आहे. याचा पोलिसांनी तपास करावा अन्यथा आम्ही नावे घेऊन सांगू असेही संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्रात घाशीराम कोतवालांचं राज्य सुरू आहे. तीन घाशीराम कोतवाल राज्य करत आहेत. घाशीराम कोतवालाच्या कार्यकाळात लुटमार, दरोडेखोरी होत होती, त्याने ज्या पद्धतीने लुटमार करून आपल्या मालकांना पैसे पोहचवायचा. ती एक विकृती होती. आज आपल्या राज्यावर घाशीराम कोतवालाचं राज्य आहे असे संजय राऊत म्हणाले.