Maharashtra Tiger Deaths : महाराष्ट्रात वर्षभरात ४८ वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत राज्यात ४८ वाघांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी २६ वाघांचा नैसर्गिक कारणाने, प्रत्येकी दोघांचा विष आणि शिकारीमुळे, नऊ जणांचा अपघाताने आणि नऊ जणांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची नोंद आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक २३ वाघांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशात ४१ तर उत्तराखंडमध्ये २३ वाघांचा मृत्यू झाला आहे. देशात महाराष्ट्र आघाडीवर असून प्रत्येक आठवड्यात सरासरी एका वाघाचा मृत्यू झाला आहे.
राज्यात वनसंवर्धन आणि संरक्षणावर भर दिला जात असल्याने वाघांच्या संख्येत ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगितले जाते. मात्र, दुसरीकडे गेल्या वर्षभरात राज्यात एवढे मृत्यू झाले आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) अहवालानुसार महाराष्ट्रातील वाघांच्या मृत्यूबाबतीत प्रथमच सर्वात वाईट विक्रमाची नोंद झाली आहे.
मागील वर्षी वर्षभरात २९ वाघ मृत्युमुखी पडले होते. त्यात तब्बल ३६ टक्के वाढ झालेली आहे. विकास कामांमुळे जंगल कमी होत असताना वाघांना त्यांचा अधिवास मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. अथवा नवा अधिवास शोधताना अपघातात मृत्यू पावणाऱ्या वाघांची संख्या सतत वाढते आहे. देशात वर्षभरात १७८ वाघांचा मृत्यू झालेला आहे. मागील वर्षी हा आकडा १२१ होता. म्हणजे देशातच वाघाच्या मृत्यूच्या दरात वाढ झालेली आहे.
राज्यातील वाघांचे मृत्यू (स्रोत वन विभाग)
- २०२१ – ३२
- २०२२ – २९
- २०२३ – ४८
देशातील वाघांची मृत्यू संख्या
- २०२१ – १२७
- २०२२ – १२१
- २०२३ – १७८
२०२३ वाघांच्या मृत्यूची स्थिती
- महाराष्ट्र – ४८
- मध्यप्रदेश – ४१
- उत्तराखंड – २३
- कर्नाटक – २१
राज्यात वाघांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे मानव- वन्यजीव संघर्ष वाढलेला असल्याने वाघांना अनेकदा विषप्रयोगाला समोर जावे लागत आहे. त्यामुळेही मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. अनेक वाघांचे मृत्यूही पुढे येत नाही ही गंभीर बाब आहे. याशिवाय विविध अपघात, विजेचा धक्का हे प्रमुख कारणामुळेही मृत्यू होऊ लागले आहे. संख्या वाढत असताना संवर्धनावर लक्ष दिले जात आहे. मात्र, वाघाच्या व्यवस्थापनाबाबत आता अधिक गंभीर होण्याची वेळ आलेली आहे.
– कुंदन हाते (माजी सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ)