Makar Sankrant Patang Festival: आनंदाची पर्वणी असलेल्या मकरसंक्रांतीच्या निमित्ताने शहरात पतंगोत्सव उत्साहात साजरा केला जातो. आपल्या घराच्या गच्चीवर संपूर्ण कुटुंब मांजाची ढील देत, ओ…काट असे ओरडून जोश भरतात. विशेष म्हणजे या निमित्ताने घरोघरी सगळे कुटुंब एकत्रित होऊन खाण्यापिण्याची रेलचेल दिसून येणार आहे.
विशेषतः महाल, इतवारी, पाचपावली आणि पूर्व नागपुरासह शहरातील विविध ठिकाणी ईमारतींच्या छतावर संगीताच्या तालावर तरुणाई पतंगाच्या पेचा लढविण्याचा आनंद लुटताना दिसते. सोमवारी अनेक गच्चीवर हे चित्र असेल. शहरात बंदी असलेल्या नायलॉन मांजासह कुणीही पतंग उडविताना आढळल्यास पोलिसांकडून कारवाई होणार असून जेलची हवा खावी लागू शकत याचे भान ठेवावे लागणार आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व पोलिस ठाण्यांना मोठ्या आवाजात गच्चीवर पतंग उडवणाऱ्यांवर निर्णायक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पतंगबाजीमुळे होणारे ध्वनिप्रदूषण खपवून घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पतंग उत्सवादरम्यान असामाजिक तत्वांचे गट त्यांच्या घरांच्या गच्चीवर मद्यपान आणि नाचत असल्याच्या तक्रारींच्या अनुषंगाने पोलिस आयुक्तांनी उपरोक्त निर्देश दिले आहेत.
पोलिस उपायुक्तांना (डीसीपी) पोलिस स्टेशन स्तरावरील अधिकाऱ्यांच्या कामांमध्ये समन्वय आणि पर्यवेक्षण करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. याव्यतिरिक्त, प्रत्येक पोलिस स्टेशनच्या डिटेक्टिव्ह ब्रँच पथकांना अशा बेकायदेशीर कामांमध्ये सहभागी असलेल्यांची माहिती गोळा करण्याचे काम देण्यात आले आहे.
नायलॉन मांजासह दहा पतंगबाजांना पकडले
नागपूर ः शहर पोलिसांऩी रविवारी नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यासह पतंग उडविणाऱ्या आणि खरेदी करणाऱ्या दहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ लाख २२ हजार ४५० रुपयांचा प्रतिबंधित मांजा जप्त केला.
गुन्हे शाखेच्या युनिट पाच ने यशोधरानगरातील विनोबा भावेनगर आणि पारडी परिसरात छापा टाकून दोघांना ताब्यात घेत, ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. कमलाकर विजय हेडाऊ आणि रामबाबू प्रेमालाल नैकेले (वय ४०, रा. टिमकी, तिनखंबा, तहसील) अशी याला ताब्यात घेतलेल्यांची नावे आहे. पाचपावली पोलिसांनी पेट्रोलींग दरम्यान मिलींदनगरातून विनेश गणेश राउत (वय २७) आणि राहुल खुदीराम करमकार (वय २८) यांना नायलॉन मांजाने पतंग उडविताना ताब्यात घेतले.
अंबाझरी पोलिसांनी नविन फुटाळा येथील यश झेरॉक्स सेंटर जवळून जानकीप्रसाद सुरजलाल गुप्ता (वय ४५) याला नायलॉन मांजासह ताब्यात घेतले. तसेच गोंडटोली तेलंगखेडी येथील कलीम कबाडीचे दुकानात छापा टाकून नायलॉन मांजाची विक्री करणारे फईम सलीम बक्ष (वय २३), अब्दुल कलीम अब्दुल जब्बार (वय ३८, दोन्ही रा. टिमकी, पलाईपेठ, तहसील) यांना ताब्यात घेतले.
रामबागमधील कामगार भवन मागे विक्रांत ऊर्फ पांड्या संजय गायकवाड (वय २३, रा. रामबाग) याला नायलॉन मांजाने पतंग उडविताना ताब्यात घेतले. कळमना पोलिसांनी ओमनगर येथील शिवाजी चौकात छापा टाकून नायलॉन मांजाने पतंग उडविताना सुखबीरसिंग ऊर्फ विक्की दिलबागसिंग राजपूत (वय २३) याला ताब्यात घेतले. याशिवाय गणेशपेठ पोलिसांनीही गंजीपेठेतील जमनादास मार्गावर सदानंद मठाजवळ पतंग उडविणाऱ्या मयंक संतोष यादव (वय २२) यास ताब्यात घेतले. याशिवाय भालदारपुऱ्यातील हज हाउस मागे शेख शाहरूख शेख (वय २४ ) यालाही ताब्यात घेतले.
आज उड्डाणपुलावरील वाहतूक बंद
मकरसंक्रातीच्या निमित्ताने सोमवारी शहरातील उड्डाणपूल बंद ठेवण्यात आले आहेत. सकाळी सहा ते सांयकाळी सहा दरम्यान उड्डाणपुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येईल. यामध्ये शहरातील सर्वच उड्डाणपुलांचा समावेश केला आहे. विशेष म्हणजे, नागरिकांनी घराबाहेर पडताना, गळ्याभोवती कापड वा वाहनाला यू गॅझेट लावून बाहेर पडावे.