मुंबईः माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीला Adv. गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केलाय.
गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, आंतरवाली सराटीमध्ये जावून ज्यांनी मनोज जरांगे यांना सर.. सर… केलं, जे कार्यकर्ता स्वरुप म्हणा किंवा भाईचारा स्वरुप म्हणून जरांगेंकडे गेले, त्यांचीच निवड आता राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी केलेली आहे. पूर्वी ते कोणत्याही भूमिकेत गेलेले असले तरी आता ते घटनात्मक पदावर बसलेले आहेत.
सरकार मागास आयोग गठीत करत आहेत की मराठा आयोग? असा प्रश्न सदावर्ते यांनी उपस्थित केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शुक्रेंची नियुक्ती केलेली आहे का? नियुक्तीसाठी अर्ज मागवले होते का? व्यक्ती आवडतो म्हणून ममत्वभावाने नियुक्ती केली आहे? असे प्रश्न सदावर्तेंनी उपस्थित केलं.
सुनील शुक्रे पारदर्शकपणे काम करतील का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी निवडीविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. विरोधाला विरोध म्हणून होत असलेल्या आरोपांवर सदावर्ते म्हणाले, संविधानिक बाबी पारदर्शकपणे मांडणं सोपं काम नाही, मी आरक्षणाच्या प्रश्नावर लढत राहणार असंही सदावर्ते यांनी स्पष्ट केलं.