maharashtra News

Maratha Reservation: “जरांगे जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल”; मराठा मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवारांची भूमिका

मुंबई : मराठा आरक्षणासाठी आंदोलक नेते मनोज जरांगे हे सध्या मुंबईच्या वेशीवर आपल्या लाखो समर्थकांसह दाखल झाले आहेत. सरकारसोबत यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं मुंबईकडं निघालेलं हे आंदोलन थांबवण्याचा निर्णय होईल की नाही हे लवकरच स्पष्ट होईल.

पण जरांगे जो काही निर्णय घेतील तो सामाजाला मान्य असेल अशी भूमिका मराठा मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी मांडली आहे.

आझाद मैदानातच गुलाल उधळायचा आहे

एका वृत्तवाहिनीशी बोलताना वीरेंद्र पवार म्हणाले, “ज्या पद्धतीनं गेल्या चार ते पाच महिन्यांपासून मनोज दादांनी सपाटा लावला आहे कार्यक्रमांचा त्यातून मला शब्द दिला आहे की, आझाद मैदानात गुलाल उधळायचा आहे. आम्हाला या स्टेजचा मंडप करायचा नाही. ही वास्तू जी आहे तिथं गुलाल उधळला गेलाच पाहिजे.

जरांगे ज्या पद्धतीनं समाजासाठी लढत आहेत आणि शिष्टमंडळाशी बोलत आहेत, आम्हाला एवढंच वाटतं की यातून सकारात्मक चर्चा निघावी. राज्य सरकारनं दोन पावलं पुढं यावं. आज ७५ वा प्रजासत्ताक दिन आहे आजच्या दिवशी तरी मराठा समाजाला आरक्षण मिळावं”

जरांगे जो निर्णय घेतली तो मान्य

मनोज जरांगे जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य असेल कारण एका माणसावरती विश्वास ठेवल्यानंतर मान्य अमान्यतेचा प्रश्नच नाही. त्यांनी जो निर्णय घेतला तो आम्हाला सर्वांना मान्य असेल. माझ्या सारख्या माणूस यामध्ये कुठलाही किंतू-परंतू करणार नाही, असंही पवार यांनी म्हटलं आहे. 

विजयोत्सवासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः आझाद मैदानात यावं

विजयोत्सवासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः यावं, आज तर प्रजासत्ताक दिनीच तो होणार असेल तर यापेक्षा चांगलं भाग्य आमच्याजवळ काहीही नसेल. आमची लढाई ही राजकीय नाही तर सामाजिक लढाई आहे.

आमची लढाई कोणाव्यक्तीविरोधात नाही आमची लढाई आमच्या समाज बांधवांसाठी आहे. गोरगरीब जनतेसाठी आहे. त्यामुळं राम जन्मभूमीच्या सोहळ्यावेळी जेवढे फटाके महाराष्ट्रात उडाले नसतील त्याच्या दुप्पट फटाके राज्यात उडतील असंही विरेंद्र पवार यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *