पिंपरी – शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पिंपरी-चिंचवड शहरात होत आहे. संमेलनाच्या मुख्य मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. इतरही तयारीला वेग आला आहे. शनिवार (ता. ६) व रविवारी (ता. ७) होणाऱ्या संमेलनांतर्गत विविध कार्यक्रम चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, निगडी प्राधिकरणातील गदिमा नाट्यगृह, संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर, नवी सांगवीतील निळूभाऊ फुले नाट्यगृह, भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात होणार आहेत.
हे नाट्य संमेलन सहा व सात जानेवारीला चिंचवड येथील श्रीमन् महासाधू मोरया गोसावी क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आले आहे. अवघ्या चार दिवसांवर येवून ठेपलेल्या या नाट्य संमेलनाच्या मुख्य सभामंडपाचे काम श्रीमन् महासाधू मोरया गोसावी क्रीडा संकुलावर वेगात सुरू आहे. साठ बाय ८० फूट लांब व रुंद इतका हा मंडप आहे. लहान मुलांच्या कार्यक्रमासाठी भव्य बालमंच देखील उभारण्यात येत आहे. दोन दिवस उद्योगनगरीत रंगणाऱ्या या नाट्य संमेलनासाठी जोरदार तयारी सुरू आहे.
नाट्य संमेलनाच्या वाटचालीतील हे शंभरावे संमेलन असल्याने या संमेलनाला विशेष महत्त्व आहे. राज्यभरात या नाट्य संमेलनाचे कार्यक्रम घेतले जाणार आहेत. संमेलनाच्या तयारी विषयी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पिंपरी-चिंचवड शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर म्हणाले, ‘‘नाट्य संमेलनाच्या तयारीने वेग घेतला आहे.
मुख्य सभामंडप आणि बालमंच या शिवाय पिंपरी-चिंचवड शहरातील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह (चिंचवड), निळू फुले नाट्यगृह (सांगवी), गदिमा नाट्यगृह (प्राधिकरण), अंकुशराव लांडगे नाट्यगृह (भोसरी) अशा सहा ठिकाणी रंगभूमीवर गाजलेली व्यावसायिक नाटके, बालनाट्य, उल्लेखनीय एकांकिका, प्रायोगिक नाटके, संगीत रजनी, संगीत नाटक यांसह ६४ विविध सांस्कृतिक व नाट्य विषयक कार्यक्रम व नाटकांचे सादरीकरण होणार आहे.’’
माजी अध्यक्षांची छायाचित्रे मंडपात
मुख्य मंडपात दोन्ही बाजूंना माजी अध्यक्षांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. यामध्ये दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. यासह नाट्य संमेलनाचा प्रवास मांडण्यात येणार आहे.