Truck Driver Strike: ट्रकचालकांनी पुकारलेल्या संपामुळे एसटी महामंडळाच्या वाहतूक सेवेवरही परिणाम झाला होता. संप मिटल्यामुळे बुधवारी दुपारी डिझेल टँकर आगारात पोहोचल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास घेतला. मात्र, तत्पूर्वी सकाळी डिझेलअभावी काही गाड्या रद्द कराव्या लागल्या, तर काही गाड्यांचे किलोमीटर मध्येच रद्द करावे लागले.
मंगळवारी सकाळी गणेशपेठ व घाटरोड आगारात डिझेलसाठा कमी असल्यामुळे सकाळी ८.३० वाजता अमरावती येथे जाणारी बस रद्द करण्यात आली. तर मध्यप्रदेशातील आंदोलनामुळे इंदूर येथील बस धारणीपर्यंत चालविण्यात आली व काही बसेस उशिरा सोडण्यात आल्या. अखेर दुपारी २ वाजताच्या सुमारास गणेशपेठ व घाटरोड आगाराला डिझेल मिळाले.
त्यामुळे बस वाहतूक सुरळीत झाली. सद्यस्थितीत इमामवाडा, रामटेक, सावनेर आणि वर्धमाननगर आगारातील बसेस गणेशपेठ आगारातून डिझेल भरून वाहतूक करीत आहेत. वर्धमानगर, रामटेक व अन्य आगाराला गुरूवारी डिझेल मिळणार असून, बस वाहतूक शंभर टक्के पूर्ववत होईल, अशी माहिती एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
संपामुळे सोमवारी नागपूर विभागातील राजनांदगाव, लालबर्रा येथे जाणाऱ्या तीन आणि अमरावती येथे जाणाऱ्या १० बसेस रद्द करण्यात आल्या होत्या. तर छिंदवाडा, शिवणी, मोहगाव, पिपळा नारायणवार येथे जाणाऱ्या बसेस सावनेरपर्यंत चालविण्यात आल्या होत्या. यासह विविध आगारांतील बसेसच्या १०३ फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या.
डिझेलसाठा कमी असल्यामुळे रामटेक आगारातील बसेसच्या १० आणि इमामवाडा आगारातील बसेसच्या आठ फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. मध्यप्रदेश व छत्तीसगड येथील सर्वच बसेस रद्द केल्या होत्या. यासह घाटरोड आगारातून ३४, गणेशपेठ, काटोल, सावनेर व वर्धमाननगर आगारातून प्रत्येकी चार अशा एकूण ५० फेऱ्या या दरम्यान रद्द करण्यात आल्या होत्या.