Mumbai News: मध्य प्रदेशातील यात्रेकरू गुजरात कडे जात असताना, मोखाड्यातील पेट्रोल पंपावर ट्रॅव्हल कंपनी अडकली होते. त्याची माहिती मिळताच मोखाड्यातील दक्ष नागरीक नितीन आहेर यांनी ही बाब ऊपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांना कळवली.
त्यांच्या सुचनेनुसार मोखाड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदिप गिते यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन भुकेलेल्या यात्रेकरूंना जेवणाची व्यवस्था केली. यात्रा कंपनी आणि यात्रेकरूंमधील तिढा सोडवला आणि त्यांचा पुढील प्रवासाचा मार्ग मोकळा करून दिला आहे. त्यामुळे परराज्यातील वयोवृद्ध यात्रेकरूंनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
मोखाड्यातील दक्ष नागरीक, जिल्हा परिषदेचे शिक्षक नितीन आहेर 27 जानेवारी ला सायंकाळी त्यांच्या आई सोबत पेट्रोल टाकण्यासाठी मोखाड्याजवळील पेट्रोल पंपांवर गेले होते. त्यावेळी त्या ठिकाणी दोन लक्झरी बस मधील 115 वयोवृद्ध महिला व पुरुष थंडीत कुडकुडत तिष्ठत बसलेले आढळले. यावेळी नितीन आहेर यांनी त्यांची चौकशी केली असता हे वयोवृद्ध यात्रेकरू मध्यप्रदेशहून जातकडे जात असल्याचे समजले. तेथे ते गाडीत डिझेल टाकण्यासाठी पेट्रोल पंपावर थांबले होते.
सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या नितीन आहेर यांनी संवाद साधला असता, गाडीत डिझेल टाकले, परंतु डिझेलचे पैसे द्यायला त्यांच्याकडे रक्कम नसल्याने गाड्या पेट्रोल पंपावर थांबल्या होत्या. सदरचे यात्रेकरू 26 जानेवारी ला मध्यरात्री पासुन 27 तारखेच्या सायंकाळी 7 वाजेपर्यंत थंडीत कुडकुडत तिष्ठत बसलेले होते. नितिन आहेर यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती ऊपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांना दूरध्वनीवरून मेसेज द्वारे कळवली.
ऊपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, तत्परतेने मोखाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदिप गीते यांना घटनास्थळी जाण्याच्या सुचना दिल्या. प्रदिप गिते घटनास्थळी गेले असता, यात्रेकरू आणि यात्रा कंपनी मध्ये पैश्याच्या देवाणघेवाणीत तिढा असल्याचे समजले. तसेच सदरचे वयोवृद्ध यात्रेकरू दिवसभरापासुन भुकलेले असल्याची व्यथा त्यांनी मांडली.
यावेळी गिते यांनी प्रथम यात्रेकरूंची जेवणाची व्यवस्था करण्यास गाडी सोबत असलेल्या व्यवस्थापकास सांगितले. त्यानंतर गिते यांनी यात्रा कंपनी च्या मुख्य व्यवस्थापकास दूरध्वनी वरून संपर्क साधुन भाड्याच्या पैशाचा तिढा मिटवला. तसेच डिझेल चे पैसे देऊन त्यांना पुढील यात्रेसाठी गुजरात कडे रवाना केले. दरम्यान, सदरचे यात्रेकरू सकाळी गुजरात मध्ये सुखरूप पोहोचल्याचा मागोवा घेतल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदिप गिते यांनी सकाळ ला दिली आहे. दक्ष नागरीक आणि पोलीसांच्या मदतीने परराज्यातील वयोवृद्ध यात्रेकरूंची फरफट थांबली आहे.