एकविसाव्या शतकातही हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. कोणतेही कार्य असो, त्यासाठी मुहूर्त अथवा कुंडलीही पाहिलीच जाते. यासाठी अर्थातच आठवतात गावातील ब्राह्मण, गुरुजी.
ज्योतिषशास्त्र हा ब्राह्मण वर्गाचा पारंपरिक अभ्यास असला तरी आज ज्योतिषशास्त्रात विविध धर्म व समाज पारंगत होत ज्योतिष पाहण्यासह विविध मुहूर्त व कुंडली पाहणे त्यांनी सुरू केले आहे.
दहिगाव (ता. यावल) येथील मुस्लिम धर्मातील बिस्मिल्ला नुरा पिंजारी सुमारे ३० वर्षांपासून ज्योतिष पाहण्यासह विविध मुहूर्त व कुंडली पाहण्याचे काम करत आहेत. ज्योतिषशास्त्र व पंचांगाच्या आधारे मुस्लिम धर्मातील व्यक्तीकडून विविध कार्याचे मुहूर्त, कुंडली पाहणे, हे दुर्मिळ उदाहरण असेल. विवाह प्रक्रियेतील पहिला टप्पा म्हणजे कुंडली (लग्न जुळते किंवा काही अडचणी आहेत) किंवा जन्मपत्रिका जुळवणे होय.
त्यासाठी कुंडलींची देवाणघेवाण करणे यासह घरशांतीचे मुहूर्त पाहणे, यास हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. एकविसाव्या शतकातही ज्योतिष पाहणे, कुंडली, मुहूर्त पाहणे हे कमी न होता उलट दिवसेंदिवस वाढतच असल्याची उदाहरणे आहेत. अर्थात, यासाठी गावातील, शहरातील ब्राह्मणवर्ग, गुरुजी, पंडित यांच्याकडे हे सर्व पाहिले जाते.
ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणारे लोक ब्राह्मण होते, असे अनेक पौराणिक स्त्रोत सांगतात. ते ज्योतिषशास्त्रात पारंगत होते आणि त्यांनी वैदिक विधी, शिक्षण आणि आयुर्वेदिक उपचारांचा सरावही केला. तथापि वैज्ञानिक संशोधनाच्या पार्श्वभूमीवर, आयुर्वेदिक व ज्योतिषशास्त्रात पदव्युत्तर पारंगत होत विविध धर्मातील व जातीतील लोकांनी ज्योतिषशास्त्रात प्रावीण्य मिळविले आहे.
दहिगाव येथील मुस्लिम धर्मातील बिस्मिल्ला नुरा पिंजारी सुमारे ३० वर्षांपासून ज्योतिष, विविध मुहूर्त व कुंडल्या पाहण्यासह मनशांतीसाठी विविध धार्मिक विधीचा सल्ला देतात. पिंजारी आयुर्वेद व ज्योतिषशास्त्रात पदवीधर आहेत. पंचक्रोशीतील हिंदू धर्मातील अनेक लोक त्यांच्याकडे ज्योतिष व विविध मुहूर्त पाहण्यासाठी येत असतात. मुस्लिम धर्मातील व्यक्ती पंचांगाच्या आधारे राशीनुसार ज्योतिष पाहत कुंडली, मुहूर्त पाहणे हे दुर्मिळ उदाहरण असेल.
पिंजारी यांच्याकडे शंभर वर्षांचे पंचांग आहे. त्या आधारे ते जन्मपत्रिकेच्या आधारावर ज्योतिषसह ग्रहमान स्थिती, तसेच मुहूर्त व कुंडली पाहतात. जन्मतिथी, स्थळ आणि वेळ यांच्या मदतीने व्यक्तीची कुंडली तयार केली जाते. यामध्ये त्या व्यक्तीच्या राशीचा उल्लेख असतो.
जन्माच्या वेळी ग्रह-नक्षत्राच्या स्थितीवरून प्रत्येकाची रास ठरत असते. प्रत्येक राशीचा संबंध ठराविक ग्रहाशी जोडण्यात येतो, असे सांगितले जाते. ग्रहाच्या बदललेल्या स्थितीवरून त्या-त्या राशीच्या लोकांच्या आयुष्यावर प्रभाव पडत असल्याचे शास्त्र सांगते. पिंजारी रत्नशास्त्रातही पारंगत आहेत. कोणत्या राशीसाठी कोणता रत्न फायदेशीर ठरेल, याबाबतही ते सल्ला देतात.
“पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करून पदवी संपादन केली. हिंदू बांधवांमध्ये ज्योतिष शास्त्राविषयी श्रद्धा आहे. या श्रद्धेच्या आधारे मनुष्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. अर्थातच एक विश्वास मिळतो. या अभ्यासक्रमामध्येच रत्नशास्त्र तसेच वास्तुशास्त्र हाही अभ्यास येत असल्याने याविषयी सल्ला देतो.” – बिस्मिल्ला नुरा पिंजारी, ज्योतिषशास्त्र अभ्यासक