Namco Bank Election Result : जिल्हयासह उत्तर महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या दि नाशिक मर्चन्ट्स को. आॅप बँकेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक सोहनलाल भंडारी, उपाध्यक्षपदी रंजन ठाकरे तर, जनसंपर्क संचालकपदी अशोक सोनजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
या निवडीने भंडारी यांना तिस-यांदा अध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे. तर, ठाकरे यांना पहिल्यादाचं उपाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.
सातपूर आयटीआय सिग्नल येथील बँकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात सोमवारी (ता.१) नवनिर्वाचीत संचालक मंडळाची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड प्रक्रिया पार पडली.
अध्यक्षपदासाठी भंडारी व उपाध्यक्षपदासाठी ठाकरे यांचे एकमेव अर्ज दाखल झाले. त्यामुळे मुलाणी यांनी भंडारी यांची अध्यक्षपदी तर, ठाकरे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. बैठकीत अभिनंदनाच्या सभेत मावळते चेअरमन वसंत गिते, व्हाइस चेअरमन प्रशांत दिवे, जनसंपर्क संचालक सुभाष नहार यांचा गौरव करण्यात आला.
यंदा बँकेचे डिपॉझिट पाच हजार कोटींचे उद्दिष्ट असून, कुठलाही डाग न लावता बँकेचे कामकाज प्रभावीपणे सुरू आहे. पुढील काळात नेत्रदीपक प्रगती करणारी एकमेव नामको बँक असेल असे वसंत गिते यांनी सांगितले.
यावेळी आमदार दिलीप बनकर, माजी आमदार जयंत जाधव, बाळासाहेब सानप, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, पिंमको बँकेचे अध्यक्ष वर्धमान बुरड, चांदवड बोर्डींगचे सेक्रेटरी अजित सुराणा, निफाडचे विक्रम रणदिवे, उमेश मुंदडा, शोभा छाजेड, सुभाष नहार, प्रशांत दिवे, अविनाश गोठी, बॅंकेचे संचालक विजय साने, हेमंत धात्रक, प्रकाश दायमा, गणेश गिते, अविनाश गोठी, महेद्र बुरड, आकाश छाजेड, भानुदास चौधरी, हरीश लोढा, सुभाष नहार, देवेद्र पटेल, ललीतकुमार मोदी, नरेंद्र पवार, प्रफुल संचेती, प्रशांत दिवे आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ संचालक भंडारी यापूर्वी 2006 मध्ये सहा महिने अध्यक्ष होते. त्यानंतर २०१९ मध्ये सव्वा वर्षे त्यांनी अध्यक्षपदाच्या माध्यमातून बँकेचा कार्यभार बघितला. आता तिस-यांदा त्यांना संधी मिळाली आहे.
”’यंदा पुन्हा सभासदांनी विश्वास व्यक्त करून एकहाती सत्ता दिली. गत पाच वर्षाच्या कामकाजाची ही पावती आहे. आरबीआयचे नियम कठीण झाले असून, यातून सर्वांना मार्ग काढायचा आहे. बँकेच्या उज्वल भवितव्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. तसेच कर्ज वाटून नफा कमविण्यापेक्षा सभासदांना शाखेच्या माध्यमातून सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहिल.’‘- सोहनलाल भंडारी, नवनिर्वाचीत अध्यक्ष, नामको बॅक.
”बॅकेच्या नेतृत्वाने विश्वास टाकला त्याबद्दल धन्यवाद. सभासदांच्या हितासाठी काम करणार. बॅंकेचे कामकाज हे लोकाभिमुख करण्यावर भर असणार आहे.”-रंजन ठाकरे, नवनिर्वाचीत उपाध्यक्ष, नामको बॅक