Nanded News : विविध १८ प्रकारच्या पारंपारिक कारागिरांना व्यवसायासाठी प्रशिक्षण, आर्थिक मदत व प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत ग्रामीण भागातील व्यावसायिक कामगारांनी ग्रामपंचायतीमार्फत प्रस्ताव सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतंर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी १८ प्रकारच्या पारंपारिक कारागिरांना पाच टक्के व्याजदरासह पहिल्या टप्प्यात एक लाख रुपये तर दुसऱ्या टप्प्यांत दोन लाख रुपयाचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेच्या पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या कारागिरांना ५ आणि १५ दिवसीय प्रशिक्षण दिले जाणार आहे.
५ दिवसीय बेसिक प्रशिक्षण व १५ दिवशीय पूर्ण प्रशिक्षण कालावधीत दररोज पाचशे रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. प्रशिक्षणानंतर प्रधानमंत्री विश्वकर्मा प्रमाणपत्र तसेच आयडी कार्ड प्रदान केले जाईल.
प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कारागिरांना टूल किट खरेदीसाठी १५ हजार रुपयाचे इ-व्हाउचर दिले जाणार आहे. तसेच प्रशिक्षण घेणाऱ्या कारागिरास व्यवसाय सुरू करण्यासाठी ५ टक्के व्याजदरासह पहिला टप्प्यात एक लाख तर दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपये कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
यामध्ये सुतार, लोहार, सोनार (दागिने कारागीर), कुंभार, नाभिक, माळी (फुल कालागीर) कारागीर, धोबी, शिंपी, गवंडी, चर्मकार, अस्त्रकार, बोट बांधणारे, अवजारे बनवणारे, खेळणी बनवणारे, कुलूप बनवणारे, विणकर कामगार यांचा समावेश आहे.
७,१५८ जणांची जिल्ह्यात नोंदणी
या योजनेत आजपर्यंत जिल्ह्यात ७ हजार १५८ लाभार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ५०१ लाभार्थ्यांच्या अर्जांना सरपंचांमार्फत मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित लाभार्थ्यांनी ग्रामपंचायत येथील आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले.
लाभार्थी नोंदणी झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी त्यास ऑनलाईन पद्धतीने मान्यता द्यावी. मान्यता देण्यासाठी सरपंचांनी देखील ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. यापूर्वी १ हजार १८६ सरपंचांची नोंदणी करण्यात आली आहे.
तालुकास्तरावर शिबिर घेऊन सरपंचांमार्फत प्राप्त अर्जांची छाननी करून मान्यता देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना नोंदणी करताना काही तांत्रिक अडचण आली तर तालुका समन्वयक आपले सरकार सेवा केंद्र पंचायत समिती येथे संपर्क करावा.
– मंजुषा कापसे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी