हदगाव : मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गाचे होणारे रस्ते संत गतीने सुरू असून नागपूर -तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाला मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. हे रस्ते दर्जेदार व जलद गतीने व्हावे अशी मागणी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी रस्ते परिवहन व राज्य मार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन केली आहे.
मागील अनेक वर्षापासून वारंगा ते महागाव या महामार्गाचे काम संथगतीने चालू असून कामावर नियंत्रण ठेवणारी एजन्सीच्या नाकर्तेपणामुळे अनेक वेळा हे काम चालू बंद अवस्थेत दिसून येत आहे. हदगाव ते वारंगा यादरम्यान तयार करण्यात आलेल्या रस्त्याला मोठ्या प्रमाणात तडे गेले. परिणामी, अपघाताचे प्रमाणही वाढले असून हा रस्ता तत्काळ व दर्जेदार करण्याच्या सूचना संबंधित एजन्सीला देण्याची मागणीही आमदार जवळगावकर यांनी यावेळी नितीन गडकरी यांना केली आहे.
एजन्सीला दर्जेदार काम करण्याच्या सूचना
नागपूर – तुळजापूर असलेल्या महामार्गाच्या दरम्यान असलेला वारंगा ते हदगाव हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाला असल्याने तो रस्ता वेळोवेळी फोडण्याचे काम एजन्सीच्या माध्यमातून चालू असून हे काम करण्याकरिता अनेक एजन्सी बदलल्या आहेत. ज्या कोणत्या एजन्सीला हे काम देण्यात आले त्या एजन्सीला दर्जेदार काम करण्याच्या सूचना देण्याची मागणीही आमदार जवळगावकर यांच्याकडून करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.